राज्यात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:35+5:302021-02-06T04:14:35+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : शेतीसाठीच नव्हे तर घराघरांमध्ये कीटकांना अटकाव करण्यासाठी कीटकनाशकांसह इतरही रसायनांचा वापर वाढला आहे. रोज नवनवे ...

The need for a 'Poison Control Center' in the state | राज्यात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ची गरज

राज्यात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ची गरज

सुमेध वाघमारे

नागपूर : शेतीसाठीच नव्हे तर घराघरांमध्ये कीटकांना अटकाव करण्यासाठी कीटकनाशकांसह इतरही रसायनांचा वापर वाढला आहे. रोज नवनवे जहाल विष बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. याचे घातक परिणामही समोर येत आहेत. नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये वर्षाला विषबाधेचे १५०वर रुग्ण येतात. असे असतानाही, महाराष्ट्रात ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नाही. परिणामी, विषाचा प्रकार, तीव्रता, गंभीरता, त्याचे निदानपासून ते उपचाराची माहिती तातडीने मिळत नाही. रुग्णांच्या लक्षणावरून डॉक्टर उपचार करीत असल्याने अनेक रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वास्तव आहे.

राज्यात सर्वत्र शेतीचे उत्पादन वाढविण्यापासून ते टिकविण्यासाठी रसायनांचा वापर वाढला आहे. फळे पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ सारख्या रसायनांचा सर्रास वापर होत आहे. घरांमध्ये धान्याचा साठा करताना कीड लागू नये म्हणूनही रसायन वापरले जात आहे. उंदीर, डास व कीटक मारण्यासाठीही विषाचा प्रयोग वाढला आहे. दिवसभरात माणूस नकळत विषाच्या संपर्कात येतो. याशिवाय कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. मेयो व मेडिकलमध्ये आठवड्याभरात विषबाधेचे तीन ते चार तरी रुग्ण येतात. परंतु ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ नसल्याने अशा रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना कठीण जाते. पोटात गेलेले विष नेमके कोणते, त्याची लक्षणे, तीव्रता, त्याचे रिअ‍ॅक्शन, निदान कसे करावे, कुठले उपचार आहेत, उपलब्ध अ‍ॅण्टिबायोटिक आदींची माहिती डॉक्टरांना मिळत नाही. विष घेतलेल्या रुग्णांच्या बाह्य लक्षणावरून जसे तोंडातून उग्र वास, डोळ्याचा बाहुलीचा आकार बदलणे, तोंडातून फेस निघणे सोबतच रुग्णाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीवरून उपचाराची दीशा ठरवली जाते. परंतु रुग्ण वाढत असल्याने उपचाराच्या या पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे झाले आहे.

-तामिळनाडू व केरळमध्येच केंद्र

शवविच्छेदन करताना मृताच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा अहवाल दिला जातो. यात मृताने विष घेतल्याची तीव्रता आणि त्या विषात असलेले घटक स्पष्ट केले जाते. मात्र हेच जिवंतपणी होत नाही. कारण यासाठी लागणारी यंत्रणा महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध नाही. भारतात केवळ तामिळनाडू आणि केरळमध्ये ‘पॉयझन कंट्रोल सेंटर’ म्हणून स्वतंत्र विभाग आहे. परंतु राज्यात विषबाधेचे रुग्ण वाढत असताना या केंद्राच्या उभारणी गरजेचे झाले आहे.

-विष नियंत्रण केंद्र आवश्यक

शासकीय रुग्णालयांत विष नियंत्रण केंद्र असणे महत्त्वाचे झाले आहे. या केंद्रासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज नाही. गरज आहे ते आधुनिक उपकरण, तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळेची. शासनाने यात पुढाकार घ्यायला हवा.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

Web Title: The need for a 'Poison Control Center' in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.