मानवहितासाठी विज्ञानाची क्षमता वाढविण्याची गरज
By Admin | Updated: March 1, 2016 02:52 IST2016-03-01T02:52:37+5:302016-03-01T02:52:37+5:30
मनुष्याच्या प्रगतीत विज्ञानाचा मोलाचा वाटा राहिला आहे. विज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात उपयोग होत आहे.

मानवहितासाठी विज्ञानाची क्षमता वाढविण्याची गरज
नीरीत विज्ञानदिन : ओ.पी. यादव यांचे प्रतिपादन
नागपूर : मनुष्याच्या प्रगतीत विज्ञानाचा मोलाचा वाटा राहिला आहे. विज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात उपयोग होत आहे. त्यामुळे मानवहितासाठी या विज्ञानात पुन्हा नवनवीन शोध करून क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अणु खनिज अन्वेषण व संशोधन संचालनालयाचे विभागीय संचालक ओ.पी. यादव यांनी केले.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्यावतीने (नीरी) विज्ञान दिनानिमित्त सोमवारी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यादव बोलत होते. नीरी संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नीरीचे प्रभारी संचालक डॉ. तपस नंदी व प्रकाश कुंभारे उपस्थित होते.
यावेळी यादव यांनी जगविख्यात शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांचा जीवनपट उलगडला. सोबतच त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि देशातील विविध ऊर्जा स्रोतांची सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले, विज्ञानाचा विविध अंगाने उपयोग होऊ शकतो. अमेरिकेने याच विज्ञानाचा जपानविरुद्ध उपयोग केला, तर त्याच वेळी महात्मा गांधी यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. सध्या भारत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अगे्रसर आहे. यात केंद्र सरकारसुद्घा या क्षेत्राला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. तपस नंदी यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्वच्छ भारत’ व ‘स्मार्ट सिटी’ या मिशन प्रोजेक्टमध्ये नीरीचा विशेष सहभाग आहे.
नीरी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सब्जीवाले यांनी केले. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नीरीतर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या विज्ञान स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धांमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी मोहित गुप्ता या विद्यार्थ्यांने पहिला पुरस्कार पटकाविला आहे, तर मोहम्मद जब्बार याने द्वितीय आणि पृथ्वी राखाडे याने तिसरा क्रमांक मिळविला.