चीनसोबत संबंध सुधारणे गरजेचे
By Admin | Updated: February 8, 2015 01:18 IST2015-02-08T01:18:42+5:302015-02-08T01:18:42+5:30
भारत-चीन संबंधात अधिक सुधारणा झाल्यास संपूर्ण जगात दोन्ही देश एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले.

चीनसोबत संबंध सुधारणे गरजेचे
राम माधव यांचे मत : दोन्ही देशांना होणार फायदा
नागपूर : भारत-चीन संबंधात अधिक सुधारणा झाल्यास संपूर्ण जगात दोन्ही देश एक नवीन शक्ती म्हणून उदयास येतील, असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केले.
आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘भारताचे शेजारी राष्ट्र : शत्रू की मित्र’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या नायर उपस्थित होत्या.
शेजारी कोण असावे हे जरी हाती नसले तरी त्यांच्या सोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे हे प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेजारी राष्ट्रांना सोबत घेऊन व त्यांना बरोबरीचे स्थान देऊन पावले उचलणे अपेक्षित आहे. मोदी यांनी पाक,श्रीलंका,चीनसोबत अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे राम माधव म्हणाले. मोदी यांचा अमेरिका दौरा, ओबामा यांची भारत भेट याचे दाखले देत राम माधव यांनी विदेश धोरण कसे असावे याबाबत भाष्य केले. कोणत्या देशात कोणत्या विचाराचे सरकार आहे हे पाहण्यापेक्षा देशहित कशात आहे हे पाहून विदेश धोरण निश्चित करावे, असे ते म्हणाले.
श्रीलंका,पाक, बांगला देश या शेजारी राष्ट्रांविषयी विस्ताराने न बोलता त्यांनी चीनबाबत मात्र विस्ताराने भाष्य केले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशापासून फक्त शेजारी राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोका आहे हे सांगताना राम माधव यांनी ओबामांनी भारतात येण्यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या तंबीचे उदाहरण दिले. पाकसोबत संबंध सुधारायचे असेल तर त्यासाठी इतर राष्ट्रांचीही मदत घ्यावी लागेल, याकडे लक्ष वेधले.
चीन विषयी बोलताना ते म्हणाले की, या देशासोबत संबंध सुधारताना त्यांची रणनीती काय आहे हे प्रथम समजून घ्यावे लागेल व त्यानंतरच पुढचे पाऊल टाकावे लागेल. तिबेटवर कब्जा केल्यानंतर चीन भारताचा शेजारी झाला. मात्र १९६२ मध्ये त्याने भारतावर हल्ला केल्याने दोन्ही देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले पण ते पुरेसे नाही. आता त्यासाठी नव्याने पावले उचलावे लागतील. सध्या भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांची सूत्रे नवीन नेतृत्वाच्या हाती असून त्यांची दृष्टी वेगळी आहे. त्याचा फायदा दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होण्यासाठी होईल. असे झाले तर दोन्ही देश जगात शक्तिशाली देश म्हणून उदयास येईल, असे राम माधव म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत मा.गो. वैद्य, आमदार अनिल सोले, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विदेश धोरणाविषयी
लोकजागृती व्हावी
विदेशी धोरण हे दिल्लीत बसणाऱ्या मोजक्याच लोकांची मक्तेदारी आहे असा समज झाला आहे. सर्वसामान्य जनता यापासून दूरच राहते. भारतात सध्या हीच स्थिती असून याचा फटका यापूर्वी देशाने सहन केला आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सामान्य जनतेतही या विषयी जागृती आणि आवड निर्माण व्हावी, असे राम माधव म्हणाले.