स्वातंत्र्य टिकविण्यासाठी लढा देण्याची गरज
By Admin | Updated: March 8, 2015 02:35 IST2015-03-08T02:35:27+5:302015-03-08T02:35:27+5:30
वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु स्वातंत्र्याचा लढा येथेच संपत नसून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी ....

स्वातंत्र्य टिकविण्यासाठी लढा देण्याची गरज
नागपूर : वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु स्वातंत्र्याचा लढा येथेच संपत नसून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा विदर्भातील महिलांनी हातात हात घालून लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांनी केले.
माधवनगरच्या माधवराव गोळवलकर सभागृहात डॉ. दमयंती पाठक यांच्या वैदर्भीय महिलांचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, लेखिका डॉ. दमयंती पाठक, मार्गदर्शिका डॉ. शांता कोठेकर उपस्थित होत्या. प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, विदर्भ ही तेजस्वी कन्यांची भूमी आहे. इतिहासातील अप्रकट माहिती दमयंती पाठक यांनी पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणली आहे. त्यांच्या हातून असेच अखंड काम घडण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावे, अशी शुभेच्छा त्यांनी दिली. लीलाताई चितळे म्हणाल्या, विदर्भातील महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या ऐकीव माहितीपेक्षा पुस्तक रूपाने माहिती मांडल्यामुळे हा महत्त्वाचा लेखी पुरावा ठरणार आहे. पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झाल्यामुळे महाराष्ट्राबाहेर वैदर्भीय महिलांचा इतिहास जाणार आहे. वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्यामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
लेखिका दमयंती पाठक यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक लिहिताना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. डॉ. अलका भेदी यांनी दमयंती पाठकसारखी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आई लाभणे अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. मार्गदर्शिका डॉ. शांता कोठेकर यांनी पुस्तक लिहिण्यासाठी दमयंती पाठक यांना गावोगावी फिरून मुलाखती घ्याव्या लागल्याचे सांगून, त्यांच्यातील उत्साहामुळेच ही बाब शक्य झाल्याची माहिती दिली. व्यासपीठार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. मंगेश प्रकाशनचे प्रसन्न मुजुमदार यांचा यावेळी सत्कार करण्यता आला. संचालन अनुराधा जोशी, प्राजक्ता टांकसाळे यांनी केले. आभार लता दाते यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)