समाजाभिमुख संशोधनाची गरज
By Admin | Updated: January 22, 2015 02:35 IST2015-01-22T02:35:17+5:302015-01-22T02:35:17+5:30
विज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. राज्यातील मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कमी पावसामुळे ....

समाजाभिमुख संशोधनाची गरज
नागपूर : विज्ञानाच्या युगात आपल्यासमोर अनेक समस्या आहेत. राज्यातील मराठवाडा तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलसंपदेचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे समाजाभिमुख संशोधनाला प्रोत्साहन द्यायला हवे, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे उपराजधानीत आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या आंतरविद्यापीठ ‘अविष्कार’ या संशोधन महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ‘आविष्कार’ या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २१ ते २३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे बुधवारी झाले. उद्घाटनप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली येथील उपमहासंचालक डॉ. के. एम. एल. पाठक, ‘माफसू’चे कुलगुरू प्रा. आदित्यकुमार मिस्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विकासाची प्रक्रिया निरंतर सुुरू राहणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच संशोधनाचा अनुभव आयुष्याची शिदोरी म्हणून बनून राहतो. संशोधन ही प्रगती, समृद्धी व समस्यांचे निराकरण करणारी गुरुकिल्ली आहे. यातूनच नवनवीन संकल्पनांना प्रत्यक्षात आणणे शक्य होते असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. संशोधन क्षेत्रातील तरुणांना विद्यापीठ व महाविद्यालयांत शिक्षक म्हणून बोलावले पाहिजे. विद्यापीठे व महाविद्यालये यांची समाजिक जबाबदारी असते व ती लक्षात घेऊन संशोधनावर भर दिला पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले. ‘अविष्कार’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. याचा फायदा व्यक्तिमत्त्व विकासासाठी तर होणारच आहे, परंतु त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल, असे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले. डॉ.मिस्त्रा यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाबाबत माहिती दिली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकुमार, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मोहन खेडकर उपस्थित होते. रेणुका देशकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)