भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज
By Admin | Updated: May 25, 2014 00:53 IST2014-05-25T00:53:37+5:302014-05-25T00:53:37+5:30
बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली पण त्यांना स्वजनांसह इतरांचाही त्रास सहन करावा लागला. धम्मदीक्षेपूर्वी सोलापूरच्या सभेत दादासाहेब गायकवाडांनीही बाबासाहेबांना विरोध केला.

भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज
भंते विमलकीर्ती गुणसिरी : २२ प्रतिज्ञा आचरण व मानवमुक्तीचे अभियान ग्रंथाचे प्रकाशन नागपूर : बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली पण त्यांना स्वजनांसह इतरांचाही त्रास सहन करावा लागला. धम्मदीक्षेपूर्वी सोलापूरच्या सभेत दादासाहेब गायकवाडांनीही बाबासाहेबांना विरोध केला. डॉ. आंबेडकरांचे अनुयायीही धम्माची दीक्षा घेण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळेच बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात त्यांचे जवळचे शिलेदार मंचावर दिसत नाहीत. आजही आपण बाबासाहेबांना समजून घेण्यात चूक करतो आहोत. आपण बाबासाहेबांवर नितांत आणि प्रामाणिक प्रेम करतो पण त्यांनी सांगितलेला उपदेश पाळत नाही. घरात देवतांच्या मूर्ती ठेवून बौद्ध धम्म समजणार नाही. यासाठी भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत भंते विमलकीर्ती गुणसिरी यांनी व्यक्त केले. २२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियानांतर्गत अरविंद सोनटक्के यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन आणि सीडीचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, उर्वेला कॉलनी येथे पार पडला. याप्रसंगी भंतेजी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बुद्ध धम्माचे निर्दालन करण्यासाठी त्याकाळी ब्राह्मणी धर्माने मुस्लिम आक्रमकांशी संधान बांधून स्वत:ला सुरक्षित केले. त्यामुळे भारतात बुद्ध धम्म लयाला गेला. त्यानंतर विषमता असणार्या हिंदू धर्मात जाण्यापेक्षा समता असलेल्या मुस्लिम धर्मात बौद्ध धम्माचे लोक गेले. हा इतिहास आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा काय आहेत. ते समजून घेऊन त्यांचे पालन करण्याची वृत्ती बाळगावी लागेल, असे ते म्हणाले. इ. एस. खोब्रागडे म्हणाले, बुद्ध धम्माच्या प्रसाराचे हे आंदोलन सातत्य राखून आहे. हा ग्रंथ त्याचाच एक भाग आहे. या प्रतिज्ञांचे सूत्र आपण समजून घेतले पाहिजे. दैववादाचे भूत बहुजन समाजावर आहे. मनुवादी व्यवस्था टिकविण्याचेच काम बहुजन करीत आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांचा विचार समाजात नेऊन विज्ञानवादी विचार पेरण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कृष्णकांत इंगळे म्हणाले, नशीब, आत्मा या बाबींना विज्ञानात काहीच अर्थ नाही. नशीब हातावर लिहिले असते तर मेडिकलमध्ये अनेक बेवारस प्रेत येतात. त्यांचे भाग्य का कुणीच सांगत नाही. मेडिकलमध्ये काही स्त्रीरोगतज्ज्ञ अमावस्या आहे म्हणून ऑपरेशन करीत नाहीत. कुणाचा मृत्यू झाल्यावर बौद्ध लोकही मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करतात. हा विज्ञानवाद नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत करण्यासाठी त्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले. हनुमंत उपरे म्हणाले, सध्याची पिढी बुद्धाचा धम्म समजून घेत आहे आणि धम्माची धारणा करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. आजच्या पिढीला पोटजातींबद्दल माहिती नाही आणि त्याची गरजही राहिलेली नाही. यातून निकोप समाजाचे स्वप्न निर्माण होण्यास मदत होईल. मुळात धम्म स्वाकारणे हे धाडसाचे काम आहे. धम्माची लकेर वाढविली आणि योग्य प्रसार केला तर हिंदू धर्मच या देशात संपेल. जेथे अंधश्रद्धा आहे तेथे विषमता राहणारच. हिंदू धर्मात दैववादाच्या, नशिबाच्या अंधश्रद्धा आहेत. हिंदू आणि राज्यघटना या देशाच एकत्र नांदू शकत नाही. हिंदू धर्मावर विश्वास ठेवून धम्माची धारणा होणार नाही, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात अभ्यासक उपस्थित होते. (प्रतिनिधी)