नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचा बाेलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:00+5:302021-01-19T04:10:00+5:30

श्याम नाडेकर लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला असून, यात राष्ट्रवादी ...

NCP's Baalbala in Narkhed taluka | नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचा बाेलबाला

नरखेड तालुक्यात राष्ट्रवादीचा बाेलबाला

श्याम नाडेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : तालुक्यातील १७ पैकी १५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला असून, यात राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित गटाकडे १४ व शिवसेना समर्थित गटाकडे एक ग्रामपंचायत गेली आहे. भारतीय जनता पक्ष समर्थित गटाला केवळ दाेन ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅग्रेस व शिवसेना हे घटक पक्ष काही गावांमध्ये संयुक्तरीत्या लढले, तर काही गावांमध्ये स्वतंत्ररीत्या लढले.

सन २०२० मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. तालुक्यात चारपैकी तीन जिल्हा परिषद सर्कल राष्ट्रवादी व एक काॅंग्रेसकडे असून, आठही पंचायत समिती सर्कल राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहे. यावेळी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींमधील (१३ पुनर्वसित ग्रामपंचायती) १४७ सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या असून, यात १४ सदस्यांची अविराेध निवड करण्यात आली. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच ग्राममपंचायत निवडणूक हाेय.

विविध राजकीय पक्ष ग्रामपंचायतींवर आपापला हक्क सांगत असले तरी विजयी उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटी व चर्चेअंती महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी समर्थित गटाने १४, तर शिवसेना समर्थित गटाने एक आणि भाजप समर्थित गटाने दाेन ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक दोन गट आमने-सामने होते. महाविकास आघाडीने विजय संपादन केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जलालखेडा, खैरगाव, अंबाडा (सायवाडा), सायवाडा, थडीपवनी, महेंद्री, दातेवाडी, उमठा, जामगाव (खुर्द), पेठ इस्माईलपूर, मदना, देवग्राम (थुगावदेव), येरला (इंदोरा), माणिकवाडा व देवळी या गावांचा समावेश आहे. सिंजर व खरबडी या दाेन ग्रामपंचायती भाजप समर्थित गटाकडे गेल्या आहेत.

...

नेत्यांची गावे

भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील काेरडे हे खैरगाव येथे निसटत्या मतांनी विजयी झाले. परंतु, त्यांना सत्ता राखण्यात किंवा बहुमत मिळविण्यात यश आले नाही. राष्ट्रवादीचे बंडू उमरकर यांनी त्यांच्या थडीपवनी येथे नऊपैकी नऊही जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. जलालखेडा येथे राष्ट्रवादी, शिवसेना व पप्पू चाैधरी (भाजप) समर्थित जनक्रांती पॅनलने राष्ट्रवादी व काॅंग्रेस समर्थित जलालखेडा सुधार समितीकडून ९ विरुद्ध ४ अशा फरकाने सत्ता बळकावली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हरणे यांनी त्यांच्या मदना या गावात सहा जागा जिंकून सत्ता शाबूत ठेवली आहे. येथील एक जागा इतराला गेली आहे.

...

ईश्वरचिठ्ठीचा काैल

तालुक्यातील दाेन उमेदवारांना ईश्वरचिठ्ठीने काैल दिला आहे. दातेवाडी येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये विलास बारमासे व सुरेंद्र इंगाेले या दाेघांनाही प्रत्येकी ९४ मते मिळाली. यात विलास बारमासे ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले. मदना येथे प्रभाग क्रमांक १ मध्ये जनार्दन उमक व धनराज उमक यांना प्रत्येकी ८१ मते मिळाल्याने निर्णय देण्यासाठी ईश्वरचिठ्ठीचा आधार घ्यावा लागला. यात ईश्वरचिठ्ठीने जनार्दन उमक यांना काैल दिल्याने त्यांना विजयी घाेषित करण्यात आले. खैरगाव येथे प्रभाग क्रमांक ४ मध्ये ग्रामविकास जनजागृती आघाडीच्या करुणा चाैधरी यांनी केवळ एका मताने विजय संपादन केला. त्यांना २५७, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी जनता विकास आघाडीच्या अर्चना काेरडे यांना २५६ मते मिळाली.

Web Title: NCP's Baalbala in Narkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.