नरखेड तालुक्यातील राष्ट्रवादीत गटबाजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:06+5:302021-07-07T04:10:06+5:30
नरखेड : नरखेड तालुक्यातील सावरगाव, भिष्णूर जि.प. सर्कल तर सावरगाव व बेलोना पं.स गणासाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ...

नरखेड तालुक्यातील राष्ट्रवादीत गटबाजी?
नरखेड : नरखेड तालुक्यातील सावरगाव, भिष्णूर जि.प. सर्कल तर सावरगाव व बेलोना पं.स गणासाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र भिष्णूर सर्कलमधून भाजपचे नितीन धोटे व सावरगाव पंचायती समिती गणाचे भाजपचे उमेदवार स्वप्निल नागपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस नेते माजी आमदार आशिष देशमुख उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासोबतच उमेदवारी अर्ज भरतेवेळी तालुक्यात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसून आले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयात मोठ्या संंख्येने गर्दी केली होती. याप्रसंगी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून उल्लंघन करण्यात आले.
सावरगाव जि.प. सर्कलकरिता ८ तर भिष्णूर सर्कलकरिता १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सावरगाव पं.स. गणाकरिता ८ व बेलोना पं.स. गणाकरिता ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरतेवेळी तालुक्यात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते व माजी आ. सुनील शिंदे यांची सून अंजली सतीश शिंदे व राष्ट्रवादीचेच समर्थक माजी सरपंच मनीष फुके यांच्या पत्नी उषा मनीष फुके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षासमोर आव्हान उभे केले.
राष्ट्रवादीकडून बेलोना पं.स. गणात यापूर्वी विजयी झालेल्या रश्मी अशोकराव आरघोडे, भिष्णूर जि.प. सर्कल राष्ट्रवादीच्या पूनम जोध यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावरगाव जि.प. सर्कलमध्ये पार्वती काळबांडे (भाजपा), देवका बोडखे (राष्ट्रवादी), ललिता खोडे, मनीषा योगेश गिरडकर (शिवसेना), अंजली शिंदे (अपक्ष), उषा मनीष फुके (अपक्ष), कलावती रेवतकर (आम आदमी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले.
भिष्णूर जि.प. सर्कलमधून नितीन धोटे, सुरेश बारई, विजय पातोडे (भाजपा), डॉ. संजय ढोकणे, मनीष काटोले (शिवसेना), प्रवीण जोध (राष्ट्रवादी), चंद्रशेखर राऊत (अपक्ष), महेंद्र कुवारे (अपक्ष), सुनील नारनवरे (वंचित बहुजन आघाडी), संजय खरपुरिया (आप) यांनी अर्ज दाखल केले.
बेलोना पंचायत समिती गणातून हेमलता सातपुते, नीलिमा कोरडे (भाजपा), ललिता कनीरे (शिवसेना), रश्मी आरघोडे (अपक्ष), मोनाली पाटील (वंचित बहुजन आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सावरगाव पं.स. गणातून स्वप्निल नागपुरे, प्रवीण वासाडे (भाजपा), वैभव दळवी (राष्ट्रवादी), राजू मोतीराम गिरडकर (शिवसेना), संदीप बालपांडे (अपक्ष), रमेश रेवतकर (अपक्ष), प्रशिक बागडे (वंचित आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.