काटोलमध्ये राष्ट्रवादी, भाजपाची होणार टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:56+5:302021-07-07T04:09:56+5:30
काटोल : काटोल तालुक्यातील जिल्हा परिषद दोन तर पंचायत समितीच्या दोन गणासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच राजकीय ...

काटोलमध्ये राष्ट्रवादी, भाजपाची होणार टक्कर
काटोल : काटोल तालुक्यातील जिल्हा परिषद दोन तर पंचायत समितीच्या दोन गणासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शेकापने आघाडी केली. त्यांनी गतवेळच्या उमेदवारांनाच मैदानात उतरविले आहे. मात्र जे सर्कल महिलांसाठी आरक्षित झाले झाले तिथे गतवेळच्या उमेदवाराच्या पत्नीला संधी दिली आहे. भाजपने दोन जागेवर नवीन चेहरे रिंगणात उतरविले आहे तर शिवसेना व वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा यावेळी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी येनवा सर्कलकरिता ४, पारडसिंगा सर्कलकरिता ४, मेटपांजरा गणाकरिता १२ तर लाडगाव गणाकरिता ३ अर्ज प्राप्त झाले.
तालुक्यातील येनवा व पारडसिंगा या जिल्हा परिषद सर्कल तर, मेटपांजरा व लाडगाव या पंचायत समिती गणाकरिता पोटनिवडणूक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकापचे समीर शंकरराव उमप यांनी येनवा सर्कलमध्ये पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमोर भाजपने राष्ट्रवादीतून आलेले नीलेश राजेंद्र धोटे यांना संधी दिली आहे. यासोबतच शिवसेनेचे अखिल प्रफुल चोरघडे तर वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ कुकडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
पारडसिंगा जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारण (महिला) संवर्गासाठी राखीव आहे. येथे राष्ट्रवादीचे गतवेळचे विजयी उमेदवार चंद्रशेखर कोल्हे यांच्या पत्नी शारदा कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. येथे गतवेळचे उमेदवार आणि भाजपाच्या किसान विकास आघाडीचे अध्यक्ष संदीप सरोदे यांच्या पत्नी मीनाक्षी सरोदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने माधुरी मंगेश सुने, वंचितच्या वतीने सुजाता नंदूजी डबरासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लाडगाव पंचायत समिती गणाकरिता महाविकास आघाडीच्या नीलिमा अनिल ठाकरे यांनी तर भाजपच्या वतीने प्रतिभा दिलीप ठाकरे, शिवसेनेच्या वतीने आरती दीपक गुजर यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. मेटपांजरा पंचायत समिती गणाकरिता निशिकांत नागमोते (काँग्रेस) यांनी नामांकन अर्ज दाखल केला. भाजपने येथे शुभम मुरलीधर रोकडे यांना संधी दिली आहे. याशिवाय शिवसेनेचे रुक्मांगद वामनराव अनवाणे, प्रवीण महादेव अडकिने, स्वप्निल सुरेश वानखेडे, बंडू ज्ञानेश्वर राठोड, गणेश बबन जिचकार, शुभम चंपतराव माहुरे, प्रवीण रामकृष्ण थोटे, धनंजय श्रावणजी शेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी तहसील कार्यालयात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले. यात कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. शक्तिप्रदर्शनावेळी उमेदवारांच्या समर्थकांनी फिजिकल डिस्टन्सिंगकडे डोळेझाक केली.
050721\img-20210705-wa0160.jpg
फोटो काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर उमप येनवा,शारदा कोल्हे पारडसिंगा सर्कल करिता तर नीलिमा ठाकरे लाडगाव व निशिकांत नागमोते मेंटपंजारा गणाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करतांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात एकत्र दाखल झाले होते यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर तहसीलदार अजय चरडे उपस्थित होते