नवरदेवाने घोड्यावरूनच भरला ५०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:08+5:302021-06-27T04:07:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाह हा प्रत्येक नवरदेवाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा सोहळा. यात घोड्यावर बसणे, मुंडावळ्या बांधण्यापासून ते ...

Navradeva paid a fine of Rs. 500 on horseback | नवरदेवाने घोड्यावरूनच भरला ५०० रुपये दंड

नवरदेवाने घोड्यावरूनच भरला ५०० रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विवाह हा प्रत्येक नवरदेवाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा सोहळा. यात घोड्यावर बसणे, मुंडावळ्या बांधण्यापासून ते आवडीचे वस्त्र परिधान करण्याचे शौक पूर्ण केले जातात. या सगळ्यांसोबतच कोरोना संक्रमणकाळात मास्क घालणे अत्यावश्यक झाले आहे. मास्क न घातल्यास कोरोना संक्रमणासोबतच कारवाईची भीतीही लागलेली राहते. शुक्रवारी अशाच एका नवरदेवाला मास्क न घालणे भारी पडले.

नंदनवन येथे शुक्रवारी घाेड्यावर स्वार नवरदेव विवाहस्थळाकडे जात होता. त्याने फेटा, शेरवानी, गॉगल आदी ऐटीत जात होता. मात्र, मास्क घातला नव्हता. मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॅड (एनडीएस)च्या जवानांना हा नवरदेव विनामास्क दिसताच, त्याच्यावर नियमानुसार ५०० रुपये दंड ठोठावला. नवरदेवासोबतच मास्क नसलेल्या अन्य तीन-चार वरातींवरही दंडाची कारवाई केली. त्यानंतर वरातीत सहभागी सर्वच जण सजग झाले. सर्वांनी मास्क तातडीने लावले. यावरून क्षण कोणतेही असो, मास्क अनिवार्य आहे, हा धडा मिळाला. मास्क कोरोना संक्रमणासोबतच दंडापासूनही तुमचा बचाव करतो.

मात्र, कोरोना संक्रमणाची लाट ओसरल्यापासून नागरिकांनी मास्क घालणे कमी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, धोका आणखी वाढण्याची भीती आहे. एनडीएसनेही नाममात्र सहा लोकांवर कारवाई करत तीन हजार रुपये दंड वसूल केला. आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या ३८,५९९ नागरिकांवर कारवाई करताना त्यांच्याकडून १ कोटी ७६ लाख ५८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

एनडीएसकडून शहरात रस्ता, फुटपाथवर निर्माण सामुग्री ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. शनिवारी कावरापेठ, शांतीनगरमध्ये बिल्डिंग मटेरियल ठेवणाऱ्यांवर दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आले. उत्तर अंबाझरी मागार्वरील अतिक्रमणधारकांवरही कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये रस्त्यावर विना परवानगी मंडप बांधणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यासोबतच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा प्रतिष्ठानांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

..............

Web Title: Navradeva paid a fine of Rs. 500 on horseback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.