‘नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती देशाच्या विकासात बाधक

By Admin | Updated: September 17, 2015 03:57 IST2015-09-17T03:57:36+5:302015-09-17T03:57:36+5:30

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती’ ही देशाच्या विकासासाठी बाधक आहे. एका सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

'Natural and man-made disaster | ‘नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती देशाच्या विकासात बाधक

‘नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती देशाच्या विकासात बाधक


एनडीआरएफला अधिक सशक्त करणार:
केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांचे प्रतिपादन

नागपूर : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती’ ही देशाच्या विकासासाठी बाधक आहे. एका सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. नैसर्गिक व मानवी आपत्तीमुळे देशातील विकासाचा दर हा दोन टक्केनी कमी राहिल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तेव्हा वाढत्या नागरीकरणाच्या आजच्या काळात नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित आपत्तीची संभाव्यता लक्षात घेऊन सर्व नागरिक आणि नागरी संरक्षणाशी संबंधित सर्वांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स’ (एनडीआरएफ)ला अधिक सशक्त करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे केले.
राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयात आयोजित उमंग-२०१५ या नागरी संरक्षणविषयक विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांना उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एनडीआरएफचे महासंचालक ओ.पी. सिंग उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू म्हणाले, दोन देशांमध्ये होणाऱ्या युद्धांची संभाव्यता जगभरात कमी झाली असली तरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा देशाची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन यादृष्टीने नागरी संरक्षण प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी संस्कृतीचे-सभ्यतेचे नुकसान होतेच, परंतु जीवित हानी झाली तरच त्याकडे लक्ष दिले जाणे या मानसिकतेतही बदल घडवून आणण्याची गरज आहे.
नागपूर येथील राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांचे एकत्रीकरण करून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ‘नॅशनल डिझास्टर रिसपॉन्स फोर्स’ (एनडीआरएफ) स्थापन करण्यात आले असून, विविध राज्यांमध्ये राज्य आपत्ती निवारण दल आणि जिल्हा पातळीवर जिल्हा आपत्ती निवारण समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. देशभरातील नागरिकांना नागरी संरक्षणविषयक प्रशिक्षण देऊन, संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सुसज्ज करण्यात या त्रिस्तरीय रचनेची महत्त्वाची भूमिका आहे. नेपाळमध्ये आलेला भूकंप आणि जपानमध्ये आलेल्या सुनामीच्या वेळी एनडीआरएफने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या माध्यमातून या क्षेत्रात भारत नेतृत्व करण्यासही सक्षम असल्याचे दिसून आले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा वाटा असून त्याच्या सुयोग्य वापराने संभाव्य हानी टाळली जाऊ शकते, याकडे लक्ष वेधत एनडीआरएफच्या सशक्तीकरणासाठी गृहमंत्रालय आवश्यक ते सर्व अर्थसाहाय्य देईल, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी एनडीआरएफचे महासंचालक ओ.पी. सिंग यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय नागरिक सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी.एस. सैनी यांनी प्रास्ताविक केले. अरुणा गजभिये यांनी संचालन केले. प्रमोद चौधरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘चीफ वॉर्डन्सचा’ सत्कार व सुवर्णपदकाचे वितरण
यावेळी नागरी संरक्षण दलाचे मुख्य पालक अर्थात ‘चीफ वॉर्डन्स’ अमरनाथसिंग सिंघल, जसबीरसिंग, ब्रिगेडियर भगवानसिंग, जिजा हरीसिंग, प्रमोद चौधरी, आर.आर. चेतन यांचा किरण रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमातील ३५ जणांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करावे
सीमेवर शांतता राहावी, हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास त्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आणि देत राहू. यासंदर्भात डीजीएमओ स्तरावर नुकतीच एक चर्चा झाली. या चर्चेत जे ठरले त्यानुसार पाकिस्तानने वागावे, अशी अपेक्षा केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: 'Natural and man-made disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.