राष्ट्रवादीची टीक टीक बंद !
By Admin | Updated: October 20, 2014 00:38 IST2014-10-20T00:38:56+5:302014-10-20T00:38:56+5:30
राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमी ‘दहा वाजून दहा मिनिटे’ झालेली दिसतात. हाच दहाचा आकडा नागपुरातही राष्ट्रवादीला चिपकला आहे. जिल्ह्यातील १२ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे

राष्ट्रवादीची टीक टीक बंद !
दहा जागांवर डिपॉझिट जप्त : आजी- माजी मंत्रीही पराभूत
नागपूर : राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमी ‘दहा वाजून दहा मिनिटे’ झालेली दिसतात. हाच दहाचा आकडा नागपुरातही राष्ट्रवादीला चिपकला आहे. जिल्ह्यातील १२ पैकी १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे ‘डिपॉझिट’(अनामत) जप्त झाले आहे. विशेष म्हणजे आघाडी सरकारमध्ये रोहयो मंत्री राहिलेले अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग या दोन्ही दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने राष्ट्रवादीची टीकटीक बंद झाली आहे.
काँग्रेस सोबत आघाडीचे जागावाटप करताना नागपूर शहरात तीन व ग्रामीणमध्ये तीन अशा किमान सहा जागा मिळाव्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मागणी होती. या जागा मिळाल्या तर आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास वेळोवेळी पक्षनेतृत्वाला दिला जात होता. शेवटी आघाडी तुटली व सहाऐवजी पूर्ण १२ जागांवर लढण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली. मात्र, या संधीने राष्ट्रवादीचे पितळ उघडे पाडले. एकही जागा निवडून आणता आली नाही. काटोलमध्ये अनिल देशमुख ५ हजार ५५७ मतांनी पराभूत झाले तर हिंगण्यात रमेश बंग यांना २३ हजार १५८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या निवडणुकीत बंग हे काठावर हरले होते, तर देशमुख हे एकतर्फी विजयी झाले होते. मात्र, या वेळी दोन्ही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या पत्नी नगरसेविका प्रगती पाटील पश्चिम नागपुरातून रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना जेमतेम ४ हजार ३१ मते मिळाली. काँग्रेसने तिकीट कापल्यामुळे आमदार दीनानाथ पडोळे हे दक्षिण नागपुरात राष्ट्रवादीकडून लढले. मात्र, ४ हजार १९४ मतांसह ते सहाव्या क्रमाकांवर घसरले.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे पुत्र डॉ. अमोल यांना रामटेकमध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्याने ते राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले. मात्र, ९ हजार ११६ मते घेत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल खांडेकर यांना उत्तर नागपुरात फक्त ७७६ मते मिळाली. उमरेडमध्ये रमेश फुले यांना २ हजार ७४७ मते, सावनेरमध्ये किशोर चौधरी यांना ६ हजार १३९ मते तर कामठीत महेंद्र लोधी यांना फक्त ७५२ मते मिळाली. राष्ट्रवादीचा हा परफॉर्मन्स नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. (प्रतिनिधी)