समस्यांच्या विळख्यात राष्ट्रीय महामार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST2021-02-07T04:09:41+5:302021-02-07T04:09:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : उमरेड-वरोरा या १०० किमी अंतराच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, या महामार्गाच्या ...

समस्यांच्या विळख्यात राष्ट्रीय महामार्ग
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिचाळा : उमरेड-वरोरा या १०० किमी अंतराच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, या महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम तीन वर्षांत पूर्णत्वास नेण्यात आले. दाेन कंत्राटदार कंपन्यांनी या मार्गावरील पूल, राेडलगतच्या नाल्या, बसथांबे, प्रवासी निवारे, मैलाचे दगड, गाव व दिशादर्शक फलक आदी कामे पूर्ण केली. परंतु, काही गावांमध्ये प्रवासी निवारे व इतर महत्त्वाच्या सुविधांची निर्मिती करण्यात न आल्याने हा महामार्ग आजही समस्यांच्या विळख्यातच अडकला आहे.
या महामार्गाच्या कामाचे कंत्राट एस. एम. एस. कन्स्ट्रक्शन आणि एस. ए. सावंत कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले हाेते. या दाेन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर महामार्गाचे काम पूर्ण केले. त्यांनी महामार्गावरील पुलांच्या बांधकामासाेबत प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती, सूचना व दिशादर्शक फलक लावणे ही कामेही केलीत. या महामार्गावरून शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुमासाेबतच माेठमाेठे दगड टाकले आहेत. या दगडांमुळे जनावरांना दुखापत हाेत असून, दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत.
उमरेड-मालेवाडा या १८ किमी मार्गाचे काम एस. ए. कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असून, कंपनीने या मार्गावरील जुने पूल ताेडून त्या ठिकाणी नवीन पुलांचे बांधकाम करणे अपेक्षित हाेते. यात मालेवाडा परिसरातील दाेन व चिचाळा शिवारातील एका पुलाचा समावेश आहे. कंपनीने चिचाळा शिवारातील जुन्याच पुलाची डागडुजी करून त्याला नवीन रुप दिले आहे. हा पूल मजबूत असल्याने नवीन पुलाचे बांधकाम केले नसल्याचे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वास्तवात, या पुलाचे बांधकाम ३० वर्षांपूर्वी करण्यात आले.या पुलाच्या बांधकामात घाेळ करण्यात आल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. मालेवाडा शिवारातील दाेन्ही पुलांचे नव्याने बांधकाम करण्यात आले.
...
प्रवासी निवाऱ्यांचा अभाव
या महामार्गावरील बहुतांश गावांमध्ये प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; मात्र ती करताना चिचाळा, पाहमी व गरडापार या तीन गावांना वगळण्यात आले. ती का वगळण्यात आली, हे कळायला मार्ग नाही. याबाबत अधिकारी बाेलायला तयार नाहीत. त्यामुळे या गावांमधील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना राेडलगत ऊन, थंडी व पावसात उभे राहून बस व इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते.
...
नळाचे पाणी राेडवर
गरडापार येथे नळाचे पाणी महामार्गावरून सतत वाहत असते. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय हाेत असून, राेडवरील पाणी अपघाताला निमंत्रण देत आहे. या ठिकाणी राेडलगत नाल्यांची निर्मिती केली असली तरी चुकीच्या कामामुळे नळाचे पाणी नालीऐवजी राेडवरून वाहते. पाहमी येथे नाल्यांची निर्मिती न केल्याने राेडवरील पावसाचे पाणी गावात शिरण्याची व गावाला तलावाचे स्वरूप प्राप्त हाेण्याची शक्यता बळावली आहे.