राष्ट्रउभारणीत समाजकार्याचे योगदान मोलाचे
By Admin | Updated: November 9, 2014 00:49 IST2014-11-09T00:49:37+5:302014-11-09T00:49:37+5:30
राष्ट्रनिर्मिती म्हणजे देशाच्या विकासात सहभाग असून त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय संपत्ती आपली आहे ही भावना निर्माण होण्याची गरज आहे. समाज कार्यकर्ता समाजाच्या समस्या जाणू शकतो.

राष्ट्रउभारणीत समाजकार्याचे योगदान मोलाचे
अनिल सोले : ‘मास्वे’च्या द्विदशकीय सोहळ्याचा समारोप
नागपूर : राष्ट्रनिर्मिती म्हणजे देशाच्या विकासात सहभाग असून त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय संपत्ती आपली आहे ही भावना निर्माण होण्याची गरज आहे. समाज कार्यकर्ता समाजाच्या समस्या जाणू शकतो. म्हणून राष्ट्राच्या जडणघडणीत त्याचे योगदान मोलाचे असून समाजाला खऱ्या अर्थाने समाजकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) च्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरात आयोजित द्विदशकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नागो गाणार होते. चर्चासत्रात पत्रकार डॉ. अजय मार्डीकर, देवेंद्र गावंडे उपस्थित होते. देवेंद्र गावंडे यांनी समाजकार्य विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन प्रात्यक्षिक करण्याची गरज असल्याचे सांगितले. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या संवैधानिक उल्लंघनावर जनतेत लोकशाहीविषयी आस्था निर्माण करण्यासाठी समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मानवी जीवनात शिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून विविध क्षेत्रात मोठमोठी व्यक्ती पदे भूषवित असून माणूसपण हरवत चालल्याची खंत व्यक्त केली. समारोपीय कार्यक्रमात मास्वेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून मास्वेची सूत्रे नव्या पिढीने ताब्यात घेण्याचे आवाहन केले. परंतु त्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात उपस्थित सदस्यांनी मान्य केली नाही. दिवसभरात एकूण १२ शोधनिबंधांचे वाचन करण्यात आले. पहिल्या सत्रात राष्ट्रनिर्मितीसाठी समाजकार्याचे योगदान यावर चिंतन करण्यात आले. दुसऱ्या सत्रात समाजकार्य अभ्यासक्रमासमोर आगामी काळात सामोरा येणारे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीचे प्रयत्न तर तिसऱ्या सत्रात शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्रशासन या संदर्भात मांडणी करण्यात आली. संचालन डॉ. भराडे यांनी केले. चर्चासत्राला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ‘मास्वे’चे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)