एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा व्हावी - प्रो. बोंद्रे
By Admin | Updated: June 18, 2016 02:26 IST2016-06-18T02:26:51+5:302016-06-18T02:26:51+5:30
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध प्रवेश परीक्षांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनीअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा द्यावी लागते.

एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम, एक परीक्षा व्हावी - प्रो. बोंद्रे
नागपूर : बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विविध प्रवेश परीक्षांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनीअरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी परीक्षा द्यावी लागते. त्यांच्याजवळ कुठलीच चॉईस नसते. त्यामुळे त्यांच्यावर आणि पालकांवर प्रचंड मानसिक आणि आर्थिक दबाव येतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम आणि एक परीक्षा ही संकल्लना राबवावी, असे प्रतिपादन प्रो. रजनीकांत बोंद्रे यांनी केले. प्रो. रजनीकांत बोंद्रे स्नेहा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित एका कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन करताना ही संकल्पना मांडली. प्रो. बोंद्रे हे शैक्षणिक क्षेत्रात मागील २६ वर्षांपासून कार्य करीत असून, त्यांच्या संकल्पनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यांचे या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड फॉर इनोव्हेशन इन एज्युकेशन फिल्डने गौरविण्यात आले आहे. प्रो. बोंद्रे म्हणाले, जेव्हा विज्ञान आणि गणिताची संकल्पना सारखी असते, तर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आणि मूल्यमापन कशाला हवे. विविध प्रवेश परीक्षांमध्ये योग्य स्पर्धा राहत नाही. काही परीक्षात निगेटिव्ह मार्किंग असते तर काही परीक्षात राहत नाही. राज्य आणि केंद्र शासन वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये परीक्षा घेते. जे विद्यार्थी शहरी भागात राहतात ते या परीक्षेसाठी तयार असतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धेतून बाहेर पडतात. एनसीईआरटी सिलॅबस आणि पुस्तके देशातील सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आले पाहिजेत. एनसीईआरटीनुसार देशात एक राष्ट्र, एक अभ्यासक्रम आणि एक परीक्षा घेण्यात यावी. मेडिकल आणि इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्रवेश या परीक्षेच्या आधारे देण्यात यावा. ही पद्धत सर्वांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टानेही विविध प्रवेश परीक्षा बंद करण्याचे आदेश दिले होते. मेडिकलच्या प्रवेश परीक्षा नीटच्या आधारे करण्यात यावी, असे सांगितले होते. या संकल्पनेचा प्रचार- प्रसार प्रो. बोंद्रे अनेक वर्षांपासून करीत असून, ते लवकरच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी भेटून ही संकल्पना पटवून देणार आहेत. (वा.प्र.)