राष्ट्रनिर्माण जुनी गोष्ट, राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:22+5:302020-12-26T04:07:22+5:30
- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे ...

राष्ट्रनिर्माण जुनी गोष्ट, राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज व्हा
- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे आणि उत्थानाच्या कालखंडास सुरुवात झाली आहे. राष्ट्रनिर्माणाच्या पलिकडे जाऊन आता राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा बिगुल वाजवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी उपाख्य सुरेश जोशी यांनी आज येथे केले. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगन पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजीव चौधरी, उपाध्यक्ष रितू चाणेकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. योगेश येणारकर, विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते.
महाभारतात महात्मा विदुरांना आदेश देण्याचा अधिकार नव्हता. मात्र, त्यांनी आपला सत्य बोलण्याचा अधिकार कधीही सोडला नाही. लोकतंत्राच्या रक्षणासाठी सर्वसामान्यांनी सत्य बोलण्याच्या अधिकारात कधीही खंड पडू देऊ नये. महात्मा विदुराच्या भूमिकेत सर्वसामान्यांनी कायम राहावे, असे आवाहन भैयाजी जोशी यांनी केले. गेल्या ७० वर्षात भारताने पाच युद्धे लढली आणि त्यातील चार युद्धात जय मिळवला. एका युद्धात राजकीय उदासीनतेमुळे विजयापासून परावृत्त राहिलो. त्या चुकांतून आता शिकणे गरजेचे आहे. वर्तमानात भारताचा जो सन्मान वाढतो आहे, तो कुशल नेतृत्वामुळे आणि हे नेतृत्व सर्वसामान्यांचा सन्मान ठेवणारे आहे. या धोरणाला बल देण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा बुलंद करावा लागेल. त्यासाठी आपल्या अंत:करणात निर्माण झालेल्या हीनग्रंथीचा नायनाट करावा लागेल. ती वेळ आता आली आहे आणि येथून पुन्हा आपण जगाला शस्त्रदाता नव्हे तर शास्त्रदाता असल्याची जाणिव करवून द्यावी लागेल, असे जोशी यावेळी म्हणाले. संचालन रवी दांडगे यांनी केले तर आभार प्रा. योगेश येणारकर यांनी मानले.
भगवद्गीतेचे आचरण अभाविप करत आहे - छगन पटेल
कोरोना संक्रमणात बलाढ्य राष्ट्र अधोगतीला आले. मात्र, भारताने याही काळात दिशा देण्याचे काम केले. आयुर्वेदाने या महामारीतून बाहेर पडण्याचे मार्ग दिले. शिक्षणाचे भारतीयीकरण व्हावे, स्वदेशीचा अंतर्भाव असावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दडपण वाटू नये, अशी मागणी सातत्याने केली. त्याचा परिणाम नव्या शिक्षणधोरण २०२० मध्ये दिसून येत आहे. अ.भा. वि.प.ने आपल्या कार्यकर्तृत्त्वातून श्रीमद्भगवद्गीतेचे आचरण दाखवले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन पटेल यावेळी म्हणाले.
..........