राठोड मंगल कार्यालयावर नासुप्रचा हातोडा
By Admin | Updated: May 20, 2016 02:36 IST2016-05-20T02:36:21+5:302016-05-20T02:36:21+5:30
बांधकामाची अनुमती न घेता हरीश राठोड यांनी मानकापूर येथील खसरा क्रमांक २३३/२४२ मध्ये दोन मजली मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले होते.

राठोड मंगल कार्यालयावर नासुप्रचा हातोडा
सलग ११ तास कारवाई : ६० पोलिसांचा ताफा
नागपूर : बांधकामाची अनुमती न घेता हरीश राठोड यांनी मानकापूर येथील खसरा क्रमांक २३३/२४२ मध्ये दोन मजली मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले होते. वारंवार नोटीस बजावल्यानंतर बांधकाम न थांबविल्याने गुरुवारी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात पोकलँडच्या साहाय्याने ही इमारत तोडली. सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत सलग ११ तास ही कारवाई करण्यात आली.
राठोड यांनी ३० बाय १३.७ मीटर जागेत दोन मजली मंगल कार्यालयाचे अवैध बांधकाम सुरू केले होते. नासुप्रचे कार्यकारी अभियंता (उत्तर)प्रमोद धनकर यांनी मंगल कार्यालयाचे अवैध बांधकाम हटविण्यासाठी १० आॅगस्ट २०१५ रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. परंतु राठोड यांनी अतिक्र मण हटविले नाही. त्यामुळे पुन्हा २५ जानेवारी २०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु राठोड यांच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार यांनी १० मे २०१६ रोजी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नासुप्रचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले होते.
परंतु हरीश राठोड यांचा मुलगा साईनाथ राठोड याने पथकावर हल्ला केला होता. यात चार कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली होती. या संदर्भात मानकापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती.
गेल्यावेळी साईनाथ राठोड यांनी कारवाईला विरोध दर्शवून कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने गुुरुवारी अवैध बांधकाम हटविताना कोणत्याही स्वरूपाची अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन मजली मंगल कार्यालयाचा बहुतांश भाग पाडण्यात आला.
सायंकाळी ७ नंतर कारवाई थांबविण्यात आली. उर्वरित अवैध बांधकाम हटविण्याची नोटीस राठोड यांना बजावण्यात आली आहे. राठोड यांनी बांधकाम न हटविल्यास नासुप्र पुन्हा कारवाई करणार असल्याची माहिती धनकर यांनी दिली. पथकात विभागीय अधिकारी एस.बी.झाडे, अनिल राठोड, सहायक अभियंता कमलेश टेंभुर्णे, स्थापत्य सहायक रामभाऊ पाटील, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख वसंतराव कन्हेरे यांच्यासह कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)