नासुप्रने मांडला लॅण्ड पुलिंग पॅटर्न
By Admin | Updated: April 24, 2015 02:13 IST2015-04-24T02:13:30+5:302015-04-24T02:13:30+5:30
शेतजमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०१४ रोजी लॅण्ड पुलिंग टेक्निक सुधार योजनेला मंजुरी दिली होती.

नासुप्रने मांडला लॅण्ड पुलिंग पॅटर्न
नागपूर : शेतजमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी राज्य सरकारने २७ डिसेंबर २०१४ रोजी लॅण्ड पुलिंग टेक्निक सुधार योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना सुमठाणा, कोतेवाडा, सोंडापार, जामठा, परसोडी या पाच गावांमध्ये राबविण्याचा नासुप्रचा मानस आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी नासुप्रने गुरुवारी संबंधित पाच गावातील जमीन मालकांची बैठक घेतली व या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली.
लॅण्ड पुलिंग पॅटर्न अंतर्गत ६०:४० चा फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला आपल्या १० एकर जमिनीवर अकृषक वापर करायचा असेल तर या योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याला ४० टक्के म्हणजे ४ एकर जमीन रस्ते, उद्यान, शाळा, हॉस्पिटल, पोलीस ठाणे यासह विविध विकास योजनांसाठी उपलब्ध करून द्यावी लागेल व उर्वरित ६० टक्के म्हणजे ६ एकर जमिनीवर त्याला अकृषक वापराची परवानगी दिली जाईल. येथे बांधकाम करता येईल. विशेष म्हणजे या जमिनीवर बांधकामासाठी १.५ एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) मिळेल. बैठकीत नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी योजनेची माहिती दिली. योजनेंतर्गत जमीन मालकाला प्रति १०० चौरस फूटला किती विकास शुल्क भरावे लागेल, हे समजावून सांगितले. या वेळी बऱ्याच जमीन मालकांनी योजनेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली. नासुप्रतर्फे संबंधितांना करारनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. याशिवाय करारनाम्याची प्रत प्रत्येक गावाच्या ग्राम पंचायत कार्यालयातही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेबाबत असलेल्या काही शंका जमीन मालकांनी मांडल्या. नासुप्र अधिकाऱ्यांनी त्या शंकांचे समाधान केले. विशेष म्हणजे जमीन मालकांनी या योजनेत आणखी काय सुविधा असाव्यात याविषयी सूचना मांडल्या. या सूचनांचा सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन सभापती वर्धने यांनी दिले. या वेळी अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, अधीक्षक अभियंता (मेट्रो) प्रवीण कीडे, नगररचना उपसंचालक सुजाता कडू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)