नासुप्रने शहर खराब केले
By Admin | Updated: November 8, 2015 02:54 IST2015-11-08T02:54:33+5:302015-11-08T02:54:33+5:30
नासुप्रच्या माध्यमातून नागपूर शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नाही. नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी शहर खराब करण्याचे काम केले.

नासुप्रने शहर खराब केले
महापौर दटके यांचे मत : बरखास्तीच्या भूमिकेवर भाजप कायम
नागपूर : नासुप्रच्या माध्यमातून नागपूर शहराचा नियोजनबद्ध विकास झाला नाही. नासुप्रच्या काही अधिकाऱ्यांनी शहर खराब करण्याचे काम केले. नासुप्र बरखास्त करण्याच्या भूमिकेवर भाजप आजही कायम आहे. राज्य सरकारही तेवढेच गंभीर आहे, असे मत महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे टिळक पत्रकार भवन येथे शनिवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात महापौर प्रवीण दटके यांनी महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा मांडला. या वेळी नासुप्र बरखास्तीच्या भूमिकेबाबत विचारले असता दटके म्हणाले, सार्वजनिक उपयोगाठी ज्या जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या, त्यातील बहुतांश जागा नासुप्रने ताब्यातच घेतल्या नाहीत. जागा आरक्षित असतानाही डेव्हलपर्सने भूखंड पाडून त्या विकल्या. सामान्य नागरिकांनी त्या विकत घेतल्या. पुढे नासुप्रने गुंठेवारी कायद्यांतर्गत ते भूखंड नियमित केले. हे सर्व करताना नासुप्रचे नियोजन चुकले, असा ठपका त्यांनी ठेवला.नासुप्रकडे एक हजार कोटी रुपये जमा होते. हा मुद्दा आम्ही लावून धरला जनतेच्या कामासाठी नासुप्रचे २०० कोटी रुपये बाहेर काढले. यातील १०० कोटी रुपये सिमेंट रस्त्यासाठी नासुप्र देणार आहे तर १०० कोटी रुपये गुंठेवारी ले-आऊटच्या विकासावर खर्च केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या हद्दीबाहेरच्या परिसराचा मेट्रोरिजन अंतर्गत विकास केला जाणार आहे. यासाठी एमएनआरडीची स्थापना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर अंमलबजावणी होणार आहे. यानंतर नासुप्रला महापालिकेच्या हद्दीत काम करण्याचा अधिकार राहणार नाही. सर्व कामे महापालिकेमार्फत केली जातील व नासुप्रचा शहरातील अधिकार व हस्तक्षेप संपुष्टात येईल, असेही दटके यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५५ ग्रीन बससाठी दोन दिवसात निविदा
नागपूर शहरात नव्या ५५ ग्रीन बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस चालविण्यासाठी नवा आॅपरेटर नेमण्यात येणार आहे. यासाठी येत्या दोन दिवसात निविदा जारी केल्या जातील. याशिवाय स्टार बसचा जुना आॅपरेटर बदलून नवा आॅपरेटर नेमण्यासाठीही निविदा काढल्या जातील. तसेच ५५ ग्रीन बसमध्ये संचालनासाठी वेगळा आॅपरेटर व तिकीट काढून पैसे महापालिकडे जमा करण्यासाठी वेगळी एजन्सी नेमली जाईल. यासाठीही निविदा काढली जाणार असल्याचे दटके यांनी सांगितले.