नारायण राणेंवर ‘विदर्भ कनेक्ट’चे टीकास्त्र
By Admin | Updated: September 5, 2014 01:07 IST2014-09-05T01:07:24+5:302014-09-05T01:07:24+5:30
‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी संघटनेने कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वेगळ्या विदर्भ राज्यासंदर्भात ‘यू टर्न’ घेतल्याचा आरोप करीत टीका केली आहे.

नारायण राणेंवर ‘विदर्भ कनेक्ट’चे टीकास्त्र
मतांसाठी वेगळ्या विदर्भाला विरोध : कॉंग्रेस पक्षाचा केला निषेध
नागपूर : ‘विदर्भ कनेक्ट’ या विदर्भवादी संघटनेने कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर वेगळ्या विदर्भ राज्यासंदर्भात ‘यू टर्न’ घेतल्याचा आरोप करीत टीका केली आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी करणे काहीच गैर नसल्याचे मत राणे यांनी काही दिवसाअगोदर व्यक्त केले होते. परंतु मुंबई येथे कॉंग्रेसचा प्रचार आरंभ करताना त्यांनी अखंड महाराष्ट्राची पाठराखण केली. शिवसेनेला घाबरून कॉंग्रेसने अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतली आहे, असा आरोप ‘विदर्भ कनेक्ट’च्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे.
काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचाराचा मुंबई येथील हुतात्मा चौकात सोमवारी प्रारंभ करताना संघटनात्मक ५४ जिल्ह्यांसाठी ५४ प्रचारज्योत प्रज्वलित केल्या. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी अखंड महाराष्ट्राची पाठराखण केली. अखंड राज्यासाठी १०५ हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाला विसरणार नाही, असे नारायण राणे यांनी वारंवार सांगितले. परंतु प्रत्यक्षात या हुतात्म्यांनी हे बलिदान विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी नव्हे तर मुंबई गुजरातला न जाता राज्यात यावी यासाठी केले होते. त्यामुळे राणे यांचा दावाच चुकीचा आहे, अशी अॅड.मुकेश समर्थ यांनी स्पष्टोक्ती केली. अकोला कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी , शांततेने आंदोलन करणारे ११३ शहीद गोवारी हे खरे हुतात्मे आहेत. त्यांचे विदर्भातील कॉंग्रेस नेत्यांना स्मरण होऊ नये ही दु:खाची बाब आहे. विदर्भाचा विकास करण्यात अपयश आलेल्या कॉंग्रेसकडे प्रचाराचे ठोस मुद्दे नाहीत. विदर्भाबाहेर तरी मत मिळावे यासाठी कॉंग्रेसने अखंड महाराष्ट्राची भूमिका घेतली आहे, असे मत अॅड. समर्थ यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)