नंदा जिचकार नव्या महापौर
By Admin | Updated: March 6, 2017 01:48 IST2017-03-06T01:48:47+5:302017-03-06T01:48:47+5:30
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नंदा शरद जिचकार तर उपमहापौरपदी दीपराज भय्याजी पार्डीकर दणदणीत मतांनी विजयी झाले.

नंदा जिचकार नव्या महापौर
८२ मतांनी विजय : उपराजधानीत महिलाराज उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड
नागपूर : महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नंदा शरद जिचकार तर उपमहापौरपदी दीपराज भय्याजी पार्डीकर दणदणीत मतांनी विजयी झाले. दोघांनाही पक्षाची सर्व १०८ मते पडली. जिचकार यांचा ८२ मतांनी तर पार्डीकर यांचा ८० मतांनी विजय झाला. यासोबतच जिचकार यांना उपराजधानीच्या प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आहे.
महापौरपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा निकोसे यांना २६ मते तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना १० मते मिळाली. उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे नितीश ग्वालबंशी यांना २८ मते तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक उशिरा पोहोचल्याने त्यांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता आले नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि एक अपक्ष असे तीन नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. एक नगरसेविका अनुपस्थित होती तर एकीने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत १५१ पैकी १४७ सदस्यांनी सहभाग घेतला.
महापालिकेच्या टाऊन हॉल येथे रविवारी सकाळी महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यासाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महापौर पदासाठी भाजपच्या नंदा शरद जिचकार, काँग्रेसच्या स्नेहा निकोसे तर बसपाच्या वंदना चांदेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपमहापौर पदासाठी
ााजपाचे दीपराज पार्डीकर, काँगेसचे नितीन ग्वालबंशी तर बसपातर्फे नरेंद्र वालदे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीतून कुणीही माघार न घेतल्याने सचिन कुर्वे यांनी निवडणुकीची प्रक्रिया घेतली. महापालिकेतील १५१ सदस्यांपैकी १०८ सदस्य भाजपाचे निवडून आल्याने सभागृहात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अपेक्षेनुसार जिचकार व पार्डीकर यांचा दणदणीत मतांनी विजय झाला. ही निवडणूक एक औपचारिकताच ठरली. (प्रतिनिधी)
सत्तापक्ष व विरोधी पक्षनेत्यांची घोषणा
महापौर नंदा जिचकार यांनी विशेष सभेत सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदी संजय महाकाळकर यांची तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी यांच्या निवड करण्यात आल्याची घोषणा केली. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता महाकाळकर यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
मतदानात १४७ सदस्यांचाच सहभाग
मतदान प्रक्रि येत राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे किशोर कुमेरिया व अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी तटस्थतेची भूमिका घेतली. शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे अनुपस्थित होत्या तर काँग्रेसच्या गार्गी चोपरा यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी व जुल्फेकार अहमद भुट्टो सभागृहात उशिरा पोहोचल्याने या दोघांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करता आले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्नेहा निकोसे यांना २६ तर नितीश ग्वालबंशी यांना २८ मते मिळाली.
स्थायी समितीत महिलाराज
महापौरपदी निवड झाल्यावर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सभागृहातील संख्याबळाच्या आधारावर स्थायी समितीच्या सदस्यांची पक्षनिहाय संख्या निश्चित करण्यात आली. त्यानुसार १६ सदस्यांपैकी भाजपा १२, काँग्रेस तीन तर बसपाच्या एका सदस्याचा समावेश आहे. भाजपाने आपल्या कोट्यातील १२ सदस्यांपैकी संदीप जाधव वगळता इतर सर्व ११ महिला सदस्यांची निवड केली आहे. यात संगीता गिऱ्हे, रिता मुळे, उषा पॅलेट, बाली हत्तीठेले, भाग्यश्री कानतोडे, स्नेहा वाघमारे, सरला नायक, मनीषा कोठे, सरिता कावरे, लता काटगाये, जयश्री वाडीभस्मे आदींचा समावेश आहे. तसेच बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांची निवड करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसची नावे पुढील सभागृहात सुचविण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी दिली.