नंदा जिचकार नव्या महापौर
By Admin | Updated: March 2, 2017 02:20 IST2017-03-02T02:20:41+5:302017-03-02T02:20:41+5:30
नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील.

नंदा जिचकार नव्या महापौर
मनपाचे कारभारी ठरले रविवारी विशेष सभेत निवड काँग्रेस,बसपाही लढणार
नागपूर: नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी जबाबदारी पार पाडतील.
भाजपचे निरीक्षक व प्रभारी आ. अनिल सोले यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत यासंबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संमतीने ही निवड करण्यात आली आहे.
रविवारी महापालिकेची विशेष सभा आहे. तीत महापौर-उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. अल्पमतात असलेल्या काँग्रेस व बसपानेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी स्नेहा विवेक निक ोसे यांनी तर उपमहापौर पदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदसाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली तर शिवसेना मात्र संभ्रमात आहे. भाजपाच्या बाजूने एकतर्फी संख्याबळ असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित असून निवडणूक ही औपचारिकता ठरणार आहे. निवडणुकीनंतर लगेच विजयी महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारतील.
भाजपाने गेल्या दहा वर्षात अडचणीवर मात करून लोकांचा विश्वास संपादन केला. पारदर्शी व विकासात्मक कारभारामुळे लोकांनी निवडणुकीत पुन्हा विश्वास दर्शविला. येणाऱ्या दिवसात नागपूर शहर विकासाच्या बाबतीत नंबर वन होईल, अशी ग्वाही आ. अनिल सोले यांनी दिली. यावेळी मावळते महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, संदीप जोशी, संदीप जाधव, माजी महापौर माया इवनाते व जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षभरात आमदार, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यामुळे निवडणुकीत महापालिके च्या इतिहासात भाजपला विक्रमी १०८ जागांवर विजय मिळाला. महापालिकेत गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक कारभार व विकासावर मतदारांनी विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा जाणार नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करू, अशी ग्वाही सुधाकर कोहळे यांनी दिली. (प्रतिनिधी)