नाना श्यामकुळे यांचा दावा फेटाळला
By Admin | Updated: February 12, 2015 02:17 IST2015-02-12T02:17:56+5:302015-02-12T02:17:56+5:30
चंद्रपूरचे भाजपचे आ. नाना श्यामकुळे यांनी दोन प्रतिवादींविरुद्ध केलेला पाच लाखांच्या अब्रुनुकसानीचा दावा सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

नाना श्यामकुळे यांचा दावा फेटाळला
नागपूर : चंद्रपूरचे भाजपचे आ. नाना श्यामकुळे यांनी दोन प्रतिवादींविरुद्ध केलेला पाच लाखांच्या अब्रुनुकसानीचा दावा सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एस. ए. हर्णे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. याशिवाय त्यांच्यावर १८ हजार ३२७ रुपयांचा खर्चही बसविला.
अॅड. पी.जी. निकोसे आणि डब्ल्यू.आर. मेश्राम, अशी प्रतिवादींची नावे आहेत. ८ जून २००९ रोजी श्यामकुळे यांनी हा दावा दाखल केला होता. प्रतिवादीनुसार प्रकरण असे की, श्यामकुळे हे त्रिशरण गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या तीन सदस्यांना दिले जाणारे तीन निवासी उपयोगाचे भूखंड खोटे शपथपत्र दाखल करून नागपूर सुधार प्रन्यासकडून स्वत:च्या नावे केले होते. त्यानंतर या तिन्ही भूखंडांवर व्यावसायिक बांधकाम केले होते. श्यामकुळे यांचा अशोकनगर येथे स्वत:चा बंगला असताना त्यांनी दाखल शपथपत्रात आपणाकडे राहण्यासाठी कोणतेही घर किंवा भूखंड नाही, असे नमूद केले होते.
या सोसायटीचे वरिष्ठ सभासद या नात्याने निकोसे आणि मेश्राम यांनी १९ नोव्हेंबर २००८ रोजी जिल्हाधिकारी प्रमुख असलेल्या जिल्हा भ्रष्टाचारविरोधी समितीकडे श्यामकुळे यांची तक्रार केली होती. ही तक्रार चौकशीसाठी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाकडे पाठविण्यात आली होती. चौकशी अधिकाऱ्याने श्यामकुळे यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. आपली समाजात मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आहे, म्हणून श्यामकुळे यांनी या दोघांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला होता. वादी श्यामकुळे हे स्वत:चा अवमान झाल्याचे सिद्ध करू न शकल्याने त्यांचा दावा फेटाळण्यात आला. न्यायालयात वादीच्या वतीने अॅड. गुंडरे तर प्रतिवादींच्या वतीने अॅड. ए. के. वाघमारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)