नाना गोखलेंनी केले विक्रमी मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 00:54 IST2014-10-16T00:54:52+5:302014-10-16T00:54:52+5:30
नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रामुख्याने नागपुरात आल्यावर नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम आहेत.

नाना गोखलेंनी केले विक्रमी मतदान
नागपूर : नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. प्रामुख्याने नागपुरात आल्यावर नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम आहेत. नाना साहित्याचे अभ्यासक, संस्कृतचे जाणकार, कवी, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संगीताचे जाणकार आणि चित्रकार आहेत. याशिवाय नानांनी आज त्यांच्या वयाची १०३ वर्षे ४ महिने आणि ११ दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे नानांच्या मतदानाबद्दल नागपूरमध्ये कुतुहलाचे वातावरण होतेच आणि नाना स्वत:ही मतदानाबद्दल आग्रही आणि उत्साही होते. सकाळी ८.३० वाजता नानांना मतदान करताना पाहून अनेकांना अभिमान वाटला आणि प्रामुख्याने तरुणाईला मतदानाची प्रेरणा त्यांच्या कृतीने आपसूकच मिळाली.
सकाळी साधारणत: ढगाळ वातावरण होते. नानांना प्रकृतीचा जरा त्रास होतो पण नाना मतदानासाठी ८ वाजताच तयार होते. त्यांचा पुत्र आचार्य विवेक गोखले यांनी त्यांना व्हील चेअरवर बसवून कर्वे शिक्षण संस्था, देवनगर येथे मतदानासाठी नेले. नाना व्हीलचेअरवर मतदानासाठी जाताना पाहून अनेकांनी नानांच्या पाठोपाठ मतदान क रण्याचा निर्णय घेतला. मतदान केंद्रावर गेल्यावर १०३ वर्षाचे नाना मतदानासाठी आल्याचे कळल्यावर साऱ्यांचेच चेहरे औत्सुक्याने भरले. केंद्रावरील अधिकारी आणि पोलीस कर्मचारीही त्यांना केंद्रात घेऊन जाण्यासाठी धावले. पण नानांचे वय झाले असले तरी त्यांचा मतदानाचा उत्साह मात्र युवकांना लाजविणारा होता. नानांनी केंद्र अधिकाऱ्यांची मदत नम्रपणे नाकारली आणि मुलाच्या आधाराने व्हीलचेअरवरून उठत थोडे अंतर ते पायी चालले. त्यानंतर साधारण पाच पायऱ्या ते चढून गेले. कुणाला मतदान करायचे आहे, ते नानांनी आधीच आचार्य विवेक गोखले यांना सांगितले होते. त्याप्रमाणे मतदान करण्यासाठी विवेकजींनी त्यांना मदत केली. मतदान केल्यावर नानांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणि हास्य होते. पण त्यांना खूप दम लागला होता. तरीही पायी चलण्याची हिंमत त्यांनी दाखविली पण दम लागल्याने त्यांना चालणे शक्य होत नव्हते. अखेर त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून व्हीलचेअरवर बसविण्यात आले. नाना व्हीलचेअरवर परतले तेव्हा प्रत्येकजण त्यांना मतदान केले का? असे विचारत होते आणि नाना प्रत्येकाला बोट दाखवून मतदान केल्याचे दाखवित होते.