लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रिपदाची प्रतीक्षा असून, अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. आता १६ जानेवारीपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील आठवड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे जाहीर होतील, असा दावा केला होता. मात्र, अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही. आता यात परत 'तारीख पे तारीख' असे चित्र निर्माण झाले आहे. अगोदर मुख्यमंत्रिपद, मग खातेवाटप व आता पालकमंत्रिपदासाठी राज्याला इतकी प्रतीक्षा करावी लागते आहे.
पालकमंत्रिपदाबाबत तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती व १५ ते १६ जानेवारीपर्यंत निश्चितपणे मार्ग निघेल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. याशिवाय त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कुठलाही अजेंडा नव्हता व लोकहिताचे कुठलेही धोरण नव्हते. केवळ भाजप व महायुतीचा विरोध करण्यासाठी ते एकत्र आले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. आम्ही मात्र एकत्रित आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयारीत आहे. आमचा पक्ष कधीही निवडणुकीला सज्ज असतो. उद्यादेखील निवडणूक लागली तरी आमची तयारी आहे. त्यामुळे वेगळ्या तयारीची गरज नाही. या निवडणुकीत महायुती राज्यात क्रमांक एकवरच असेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपकडून सदस्यता नोंदणीवर भर देण्यात येत आहे. दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांत ही संख्या गाठण्यात यश येईल. त्यानंतर बूथप्रमुख, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.