नागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूला उपराजधानीत २४ डिसेंबरपासून सुरुवात झाली. रात्री ११ नंतर पोलीस शिपायापासून पोलीस आयुक्तांपर्यंत रस्त्यावर उतरून नाईट कर्फ्यूचे कडक पालन केले जाईल, असा दावा आयुक्तांनी केला. आयुक्तांनी सर्व झोन व पोलीस ठाण्यांना कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले. रात्री ११ नंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतीही आस्थापने सुरू राहणार नाही, असे स्पष्ट बजावले. लोकमतच्या पथकाने शहरातील नाईट कर्फ्यूच्या परिस्थितीचे आकलन केले असता, काही ठराविक ठिकाणीच पोलिसांचा बंदोबस्त रात्री ११ नंतर दिसून आला. बहुतांश ठिकाणी कर्फ्यू केवळ नावालाच होता. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नेहमीसारखीच होती. पण ज्या चौकात पोलीस बंदोबस्तात होते, त्या ठिकाणी कसून चौकशी सुरू होती.
- येथे दिसून आला नाईट कर्फ्यू
छोटा ताजबागकडून सक्करदरा चौकाकडे येणाऱ्या मार्गावर पोलीस बॅरीगेड लावून वाहन तपासत होते. चार चाकी वाहनांच्या डिक्की बघत होते. दुचाकी वाहन चालकांचे कागदपत्र तसेच मोपेड वाहनांचीही डिक्की तपासत होते. कागदपत्र योग्य असेल तर त्या वाहन चालकांना सोडत होते. तर ज्यांच्याकडे कागदपत्र नाही, अथवा वाहतुकीचे नियम पाळले नाही, त्यांना चालान करीत होते. पण या चौकातील इतर रस्त्यांवरील वाहने बिनधास्त सुरू होती. सक्करदरा चौकातील उड्डाणपुलावरूनही वाहने नियमितपणे सुरू होती. मानेवाडा चौक, झिरो माईल चौक, राजेंद्रनगर चौक (नंदनवन झोपडपट्टी), मोमीनपुरा येथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. वाहन चालकांच्या कागदपत्राची तपासणी करण्याबरोबरच बाहेर पडणाऱ्यांना नाईट कर्फ्यू संदर्भात सूचना देत होेते. झिरो माईल चौकात पोलीस नाकाबंदी जोमात होती. शहरात प्रवेश करणाऱ्या मालवाहू ट्रक्सला थांबवण्यात येत होते. तसेच सर्वसामान्यांची विचारपूस, तपासणी केली जात होती.
या चौकात नाईट कर्फ्यू नावालाच
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात लोकमतच्या पथकाने रात्री ११ नंतर भेट दिली असता, तिथे नाईट कर्फ्यूसदृश स्थिती दिसून आली नाही. परिसरातील एक खानावळ रात्री सुरू होती. पण पोलिसांचे एक वाहन आले आणि तेथील वर्दळ कमी करून हॉटेल बंद केले. एसटी स्टॅण्ड चौकातही बंदोबस्तसदृश परिस्थिती दिसून आली नाही. महालातील टिळक पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौकात नाईट कर्फ्यू जाणवला नाही. बंदोबस्त नसल्याने वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू होती. कोतवाली चौक, बडकस चौक व इतवारीतील गांधी पुतळा चौकातही नाईट कर्फ्यू दिसून आला नाही. तुकडोजी चौक, म्हाळगी चौक येथीही हीच परिस्थिती दिसून आली. खामल्यातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक, बजाजनगर चौक, माटे चौक येथील परिस्थिती नेहमीप्रमाणे होती. मोरभवन, कस्तूरचंद पार्क चौक, रेल्वे स्टेशन, रामझुला, सीए रोड, लाकडी पूल, गंगाबाई घाट, जगनाडे चौक, श्रीकृष्णनगर नाईट कर्फ्यूचा परिणाम दिसून आला नाही.
- राजेंद्रनगर चौकात प्रत्येकाची होत होती नोंद
जगनाडे चौकापासून ते केडीके कॉलेज दरम्यान येणाऱ्या नंदनवन झोपडपट्टीमधील राजेंद्रनगर पोलीस चौकीपुढे पोलिसांनी कठडे लावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती. मास्क न घालणाऱ्यांनाही बजावले जात होते. प्रत्येकाची नोंद पोलीस डायरीत केली जात होती.
मोमीनुपरा येथे पोलीस आले की दुकाने बंद
रात्रीचा बाजार म्हणून विख्यात असलेल्या मोमीनपुरा रात्रीला दररोज गजबजलेला असतो. त्यामुळे, येथे बाराही महिने पोलिसांचे पेट्रोलिंग असते. नाईट कर्फ्यूमुळे मात्र गजबज विशेष नव्हती. तरीदेखील काही दुकाने उघडलेली दिसत होती. पोलीस पेट्रोलिंग व्हॅन येताच पटापट शटर डाऊन केले जात होते. पोलीस दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. मात्र, पोलीस जाताच पुन्हा शटरबंद दुकाने आतमधून सुरू असल्याचे भासत होते.