शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीपासून नागपूरच्या शिक्षक आमदारांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:12+5:302020-12-12T04:27:12+5:30
नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी खासगी शाळेतील कर्मचारी नियमावलीमधील अधिसूचनेबाबत बैठक बोलाविली होती. या बैठकीचे निमंत्रण महाविकास आघाडीच्या ...

शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीपासून नागपूरच्या शिक्षक आमदारांना डावलले
नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी खासगी शाळेतील कर्मचारी नियमावलीमधील अधिसूचनेबाबत बैठक बोलाविली होती. या बैठकीचे निमंत्रण महाविकास आघाडीच्या पदवीधर व शिक्षक आमदारांना दिले होते. त्याचबरोबर काँग्रेस शिक्षक सेलच्या राज्याच्या अध्यक्षालाही बोलाविले होते. परंतु या बैठकीतून नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार नागो गाणार यांना डावलण्यात आले. शिक्षणमंत्री शिक्षण क्षेत्रात राजकारण करून भेदभाव करीत असल्याचा आरोप गाणार यांनी केला आहे.
ही बैठक शिक्षण मंत्र्याच्या कार्यालयात गुरुवारी पार पाडली. बैठकीत विधान परिषदेचे सदस्य सुधीर तांबे, कपिल पाटील, मनिषा कायंदे, विलास पोतनिस, विक्रम काळे, सतीश चव्हाण, जयंत आसगांवकर, अभिजित वंजारी यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांच्याबरोबर शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आदींना निमंत्रण दिले होते. ही बैठक महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अधिसूचनेबाबत होती. शिक्षण मंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या समर्थित शिक्षक व पदवीधर आमदारांना निमंत्रण देऊन, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमदार व इतर संघटनांच्या अध्यक्षांना डावलले. शिक्षण मंत्र्यांची ही बाब भेदभाव करणारी असून, शिक्षकांच्या भावना, समस्या व प्रश्न बैठकीत चर्चेला येऊ नये या दृष्टीने केलेली व्यूहरचना असल्याचा आरोप आमदार गाणार यांनी केला. शिक्षण क्षेत्रात मंत्री राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
त्यांनी शिक्षण उपसंचालकांच्या मार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठवून या बैठकीत प्रकाशित केलेल्या अधिसूचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती, आक्षेप निकाली काढण्याकरिता सर्व पदवीधर व शिक्षक आमदार व विविध शिक्षक संघटनांची पुन्हा बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली आहे.