Nagpur's RTO office income decreased | नागपूर आरटीओ कार्यालयांचे उत्पन्न घटले

नागपूर आरटीओ कार्यालयांचे उत्पन्न घटले

ठळक मुद्देवायू पथकांची ६६ टक्केच उद्दिष्टपूर्ती केवळ दोनच पथकाचे यश

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे. केवळ दोनच आरटीओ कार्यालयाच्या पथकाला आपले लक्ष्य पूर्ण करता आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यालये मिळून वायू पथकाला महसूल वसुलीचे ५००८६.३९ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु पथकाला ६६ टक्के म्हणजे ३३१२७.१३ लाख महसूल गोळा करण्यात यश आले. वायू पथकांच्या अपयशामुळे कार्यालयांचे उत्पन्न घटले आहे.
आरटीओ कार्यालयांमध्ये सोर्इंचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे लक्ष्य न विसरता वाढवून दिले जाते. नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. विशेष म्हणजे, वायुवेग पथकाचा आधुनिकीकरणाचा अभाव, हे या मागील एक कारण असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार शासनाने वायू पथकाला आवश्यक त्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून दिली नाहीत. यातच शासनाने मालवाहू वाहनाची भार क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे ‘ओव्हरलोड’ वाहने ‘अंडरलोड’ झाली. दोन टनापासून १० टनापर्यंत त्यांची क्षमता वाढली. यामुळे येथून मिळणारा महसूल कमी झाला. सीमा तपासणी नाक्यावर ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टम’ला (एसओपी) सुरुवात झाली. या प्रणालीअंतर्गत १०० टक्के वाहने तपासू नका, असे आदेश आले. या सर्वांचा परिणाम वायू पथकाना उद्दिष्ट पूर्ण करण्यावर झाला. यामुळे राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयातील वायू पथकाला आपले लक्ष्यच गाठता आले नाही. केवळ पिंपरी चिचवड आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १०८ टक्के तर अहमदनगर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले.
पाच कार्यालयांचे वायू पथक ५० टक्क्यांपर्यंतही पोहचले नाही
राज्यातील मुंबई सेंटर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३६ टक्के, कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४० टक्के, सातारा आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४९ टक्के, धुळे आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३० टक्के तर हिंगोली आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले. या पाच कार्यालयांच्या वायू पथकाला ५० टक्के लक्ष्यही पूर्ण करता आले नाही.
विदर्भातील कार्यालयांच्या पथकांनी गाठली सत्तरी
विदर्भातील अमरावती कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के, बुलडाणा कार्यालयाच्या पथकाने ८३ टक्के, यवतमाळ कार्यालयाच्या पथकाने ६५ टक्के, अकोला कार्यालयाच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के, वाशीम कार्यालयाच्या पथकाने ७४ टक्के, नागपूर शहर कार्यालयाच्या पथकाने ७६ टक्के, वर्धा कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या पथकाने ७१ टक्के, गडचिरोली कार्यालयाच्या पथकाने ५९ टक्के, चंद्रपूर कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, गोंदिया कार्यालयाच्या पथकाने ८५ टक्के तर भंडारा कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांच्या पथकाने १०० टक्क्यांवर महसूल गोळा केला होता.

Web Title: Nagpur's RTO office income decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.