नागपूरचा पारा ४१ अंशावर, ढगांनी चटके राेखले, उकाडा नाही; चंद्रपूर सर्वाधिक ४३.२
By निशांत वानखेडे | Updated: April 14, 2023 18:35 IST2023-04-14T18:19:49+5:302023-04-14T18:35:34+5:30
काहीसे ढगाळ वातावरण असले तरी तापमान वाढीचे सत्र मात्र कायम आहे.

नागपूरचा पारा ४१ अंशावर, ढगांनी चटके राेखले, उकाडा नाही; चंद्रपूर सर्वाधिक ४३.२
नागपूर : काहीसे ढगाळ वातावरण असले तरी तापमान वाढीचे सत्र मात्र कायम आहे. शुक्रवारी नागपूरचा पारा ४१ अंशावर पाेहचला. ढगांमुळे उन्हाचे चटके जाणवत नसले तरी उकाडा मात्र त्रासदायक ठरत आहे. दरम्यान एप्रिलचे उन चंद्रपूरकरांसाठी सर्वाधित तापदायक ठरले असून येथे पारा ४३.२ अंशावर गेला आहे, जाे राज्यात सर्वाधिक आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सध्या विदर्भात ढगाळ वातावरण आहे पण अवकाळी पाऊस किंवा विजांची नाेंद कुठे झाली नाही. ढगांची स्थिती असली तरी सूर्याचा ताप मात्र वाढत चालला आहे. विदर्भात सर्वात कमी बुलढाणा ३५ अंश व गडचिराेली ३८ अंश वगळता इतर सर्व जिल्ह्यात दिवसाचा पारा ४० पार गेला आहे. चंद्रपूर, ब्रम्हपुरीनंतर वर्धा ४२.२ अंश, अमरावती ४१ अंश तर अकाेला, गाेंदिया, यवतमाळ ४० अंशाच्या वर आहेत.
दिवसासह रात्रीचे तापमानही वाढले आहे. चंद्रपूरमध्ये २६.६ तर वर्ध्यात २६.८ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. नागपूरला रात्रीचा पारा २४.३ अंशावर गेला. अमरावती, ब्रम्हपुरी २५.६ अंश तर यवतमाळ २५.५ अंश नाेंदविण्यात आले. गाेंदिया व अमरावती वगळता रात्रीचे तापमान सर्वत्र सरासरीपेक्षा वर आहे. पारा वाढल्याने उष्णता व उकाड्यामुळे चिडचिड करणारे वातावरण जाणवत आहे. दरम्यान शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी ढगाळ व विजगर्जन राहण्याचा अंदाज आहे.