नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान
By Admin | Updated: January 14, 2017 02:43 IST2017-01-14T02:43:48+5:302017-01-14T02:43:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे.

नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान
अनेक भीमसैनिक शहीद : दीक्षाभूमीवरून निघाला होता ऐतिहासिक लाँगमार्च
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. इतकेच नव्हे तर नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता, हे विशेष.
औरंगाबादच्या या विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि दलितांवरील हिंसाचार वाढला. या हिंसाचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. दलित अत्याचाराविरोधात ४ आॅगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ४ व ५ आॅगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. यात रतन मेंढे, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फजल हुसेन, किशोर भाकळे शहीद झाले. ११ वर्षाचा अविनाश अर्जुन डोंगरे या जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८ -७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबार केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात ज्ञानेश्वर साखरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर व डोमाजी कुत्तरमारे हे भीमसैनिक शहीद झाले.
नामांतर लढ्यात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला. मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नोव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह थॉमस कांबळे, मामा सरदार, जगदीश थूल व इतर कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर कवी इ.मो. नारनवरे यांच्यासह ३११ भीमसैनिकांना नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले होते.
नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ आॅगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर १४ जानेवरी १९९४ रोजी औरंगाबादच्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. (प्रतिनिधी)
तो लढा हक्काचा व न्यायाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणे, हा प्रश्न फक्त दलित अस्मितेपुरता किंवा केवळ पाटी बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक समतेचा, लोकशाही हक्कांचा आणि न्यायाचा होता. महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकमताने झालेल्या नामांतर ठरावाची अंमलबजावणी करून सरकार लोकशाही मूल्यांची बूज राखते की नाही, हा खरा प्रश्न होता.
-अनिल वासनिक, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते
लोकशाहीच्या हक्कासाठी भीमसैनिक शहीद
नामांतराचा लढा केवळ पाटी बदलण्यापुरता कधीच मर्यादित नव्हता तर तो लोकशाही हक्क व सामाजिक समतेचा लढा होता आणि यासाठी भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भीमसैनिकांमुळेच लोकशाहीचा व सामाजिक समतेचा हा लढा यशस्वी होऊ शकला.
- नरेश वाहाणे, नामांतर आंदोलनातील कार्यकर्ते