४६ वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात आहे नागपूरचा वीर
By Admin | Updated: April 19, 2017 02:29 IST2017-04-19T02:29:49+5:302017-04-19T02:29:49+5:30
फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे हे नाव तसे उपराजधानीला अपरिचित आहे.

४६ वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात आहे नागपूरचा वीर
कधी परतणार विजय तांबे? : सुटकेसाठी सरकारचे एकदाही प्रयत्न नाहीत
आशिष दुबे नागपूर
फ्लाईट लेफ्टनंट विजय वसंत तांबे हे नाव तसे उपराजधानीला अपरिचित आहे. परंतु या नावाचा शहरातील एक वीर सुपुत्र ४६ वर्षांपासून पाकिस्तानच्या कारागृहात यातना सहन करतोय. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सैन्याने विजय तांबे यांना पकडून कारागृहात टाकले. तेव्हापासून ते युद्धकैद्याच्या रूपात पाकचा अमानवीय छळ सहन करीत आहेत. लक्ष्मीनगरात त्यांचे घर आहे. आपला मुलगा कधीतरी परत येईल, या आशेत त्यांची आई शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची वाट पाहत राहिली. अखेर मुलाच्या प्रतीक्षेतच सात वर्षांआधी त्यांचे निधन झाले. विजय यांचे नागपुरातील नातेवाईक अजूनही त्यांच्या परतण्याची वाट बघत आहेत. विजय यांच्या पत्नी दमयंती तांबे वर्ष १९७२ पासून पतीच्या सुटकेसाठी दिल्लीत केंद्र सरकारशी लढत आहेत. परंतु विजय यांच्यासोबतच अन्य युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार व अधिकाऱ्यांनी तितके प्रयत्न केले नाहीत जितके त्यांनी सरबजित किंवा नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केलेत.
दमयंती तांबे यांना हेही नाही माहीत की त्यांचे पती सध्या हयात आहेत की नाहीत. जेव्हा विजय यांना बंदी बनविण्यात आले होते तेव्हा त्यांचे वय २३ वर्षे होते. दमयंती यांच्यासोबत त्यांचे लग्न युद्धाच्या काही महिन्याआधीच झाले होते. युद्धादरम्यान कुटुंबाला ही माहिती दिली गेली की, विजय यांच्या विमानाला पश्चिमी पाकिस्तानात पाडण्यात आले. परंतु ५ डिसेंबर १९७१ साली पाकिस्तानातील एका वृत्तपत्रात काही युद्धबंदींचे छायाचित्र प्रकाशित केले गेले. ज्यातील एक फोटो विजय यांचा होता. तेव्हापासनूच दमयंती व इतर युद्धबंदींचे कुटुंबीय या वीर जवानांच्या सुटकेसाठी नियमित प्रयत्न करीत आहेत. लोकमतने दिल्ली येथील वार विडो असोसिएशनच्या कार्यालयात फोन करून दमयंती तांबे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही.