नागपूरच्या ग्रीनबस गुपचूप बंगळुरुला नेल्या ! परिवहन विभाग अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:03 IST2019-06-19T00:02:08+5:302019-06-19T00:03:24+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल्या आहेत. याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाला नव्हती.सोमवारी रात्री उशिरा परिवहन समितीचे सभापती बंटी कुक डे यांना बसेस नेत असल्याची माहिती मिळाली. ते एमआयडीसी येथील डेपोत पोहचले. परंतु येथे अखेरची एक ग्रीन बस नेण्याची तयारी सुरू होती. त्यांनी या बसची चावी ताब्यात घेण्याचे निर्देश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांना दिली. मंगळवारी सकाळी ग्रीन बसेस बंगळुरुला नेल्याची वार्ता पसरताच प्रशासनात खळबळ उडाली.

नागपूरच्या ग्रीनबस गुपचूप बंगळुरुला नेल्या ! परिवहन विभाग अनभिज्ञ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल्या आहेत. याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाला नव्हती.सोमवारी रात्री उशिरा परिवहन समितीचे सभापती बंटी कुक डे यांना बसेस नेत असल्याची माहिती मिळाली. ते एमआयडीसी येथील डेपोत पोहचले. परंतु येथे अखेरची एक ग्रीन बस नेण्याची तयारी सुरू होती. त्यांनी या बसची चावी ताब्यात घेण्याचे निर्देश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांना दिली. मंगळवारी सकाळी ग्रीन बसेस बंगळुरुला नेल्याची वार्ता पसरताच प्रशासनात खळबळ उडाली.
विशेष म्हणजे ग्रीन बसचे आरसी बुक मनपाच्या नावाने नाही. एमआयडीसी येथील डेपोची जागा मनपाची आहे. परंतु मनपा केवळ प्रति किलोमीटर संचालनानुसार स्कॅनिया कंपनीला मोबदला देत होती. इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बसचे प्रति किलोमीटर भाडे ८९ रुपये होते. सूत्रांच्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कुणालाही माहिती न देता ट्रेलरवर लादून ग्रीन बसेस बंगळुरुला नेण्यास सुरूवात झाली. सोमवारी रात्री बंटी कुकडे यांना माहिती मिळाली. परंतु याला उशीर झाला होता. ग्रीन बसेस नेल्याने सत्तापक्षात खळबळ उडाली. करारातील तरतुदीनुसार स्कॅनिया कंपनीच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची तयारी सुरू आहे.
दहा महिन्यापूर्वीच ग्रीन बसला ब्रेक
जीएसटीच्या आधारे प्रति किलोमीटर भाडे द्यावे, सुसज्ज डेपो व एस्क्रो खाते उघडण्याच्या मुद्यावरुन स्कॅनिया कंपनीने नोटीस बजावली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१८ पासून ग्रीन बसचे संचालन बंद केले. ग्रीन बस पुन्हा सुरू व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर व दिल्ली येथे स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. रेड बस ऑपरेटर ट्रॅव्हल टाइम मार्फत ग्रीन बस चालविण्याचा पर्याय सुचविण्यात आला. परंतु स्कॅनिया कंपनी बसेस चालविण्यास इच्छूक नव्हती.
स्कॅनियाची न्यायालयात धाव
स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने दोन मुद्यावरून महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पहिल्या प्रकरणात ७.५०कोटींची बँक वॉरंटी परत मिळावी न्यायालयात तर दुसऱ्या प्रकरणात कंत्राट रद्द व्हावा,यासाठी लवादाकडे धाव घेतली आहे. लवादाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बसेस नेल्याने मनपा प्रशासन नाराज आहे. आता करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यासंदर्भात न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे.
स्कॅनियाची बस चालविण्यास इच्छुक नाही
स्कॅनिया कंपनीने बंगळुरू येथील कारखान्यातील ग्रीन बसची निर्मिती बंद केली आहे. नागपुरात ५५ बसेस चालवावयाच्या होत्या. परंतु २५ बसेस सुरू होत्या. तीन डेपोत उभ्या होत्या, तर दोन बसची आरसी बाकी होती. स्कॅनियाच्या मागण्या मान्य करण्याची मनपाची तयारी होती. परंतु कंपनीची बसेस चालविण्याची इच्छा नव्हती. गोवा व ठाणे शहरातील बसेस कंपनीने आधीच बंद केल्या आहेत. असे असले तरी ग्रीन बस चालविण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली.
फौजदारी गुन्हा दाखल करणार
स्कॅनिया कंपनीने करारातील अटी व शर्तींचा भंग केला आहे. याबाबतचा अहवाल तयार करून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. शहरातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत केल्याच्या मुद्यावरून स्कॅनिया कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.