गणेश वासनिकआॅनलाईन लोकमतनागपूर / अमरावती : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खूनप्रकरणी तीनही आरोपींना जन्मठेप आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले या नागपूरच्या कन्या तर अमरावतीच्या स्नुषा आहेत. अमरावतीचा नीळकंठ चौक गणेशोत्सवासाठी राज्यभर परिचित आहे. येथे ‘आशीर्वाद’ हा केवले यांचा जुना वाडा आजही दिमाखाने उभा आहे. सुवर्णा केवले या मोरेश्वरराव केवले यांच्या स्नुषा. नागपूरच्या नाईकांच्या त्या कन्या. बी.कॉम., एल.एल.बी. झालेल्या सुवर्णा यांचे लग्न १९९१ साली अमरावतीचे किशोर केवले यांच्याशी झाले. लग्न झाले तेव्हा सुवर्णा केवले विधी पदवीधर, तर किशोर केवले हे सधन शेतकरी आहेत. पूर्वी ते कास्टिंगचा कारखानाही चालवायचे. केवले कुटुंबात आजही वडिलोपार्र्जित शेती आहे. लग्नानंतर सुवर्णा यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. यादरम्यान त्यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण केली.सुवर्णा-किशोर केवले यांनी १९९५ साली अमरावती सोडले. हल्ली ते नागपूर सिव्हिल लाइन्स भागात वास्तव्यास आहेत. कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणात सुवर्णा केवले यांनी दिलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०), नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) या तिघांना फाशीची शिक्षा त्यांनी सुनावली.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिक्षण घेत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी जनभावना होती. पुराव्यांच्या आधारे आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणाºया जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले या अमरावतीच्या स्नुषा असल्याचा सार्थ अभिमान अंबानगरीवासीयांना आहे, अशा प्रतिक्रिया शहरात उमटल्या आहेत.उपराजधानीत केली वकिलीन्यायाधीश सुवर्णा केवले यांचे माहेर नागपूरचे असून माहेरचे आडनाव नाईक आहे. त्यांनी लग्नानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक वर्ष वकिली केली. त्या येथे २००४ पासून सुमारे पाच वर्ष सहायक सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता होत्या. तसेच त्यांनी महाराष्ट्र् प्रशासकीय न्यायाधिकरणातरी अनेक महिने शासनाची बाजू मांडली. दरम्यान त्यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी आतापर्यंत विविध जिल्हा व सत्र न्यायालयांत काम केले आहे.
नागपूरच्या कन्येने दिला कोपर्डीतील पीडितेला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 09:56 IST
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खूनप्रकरणी तीनही आरोपींना जन्मठेप आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले या नागपूरच्या कन्या तर अमरावतीच्या स्नुषा आहेत.
नागपूरच्या कन्येने दिला कोपर्डीतील पीडितेला न्याय
ठळक मुद्देन्या. सुवर्णा केवले अमरावतीच्या स्नुषा