नागपूरकर ग्राहकाची मेहुल चोकसीविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:57 IST2018-02-22T00:52:46+5:302018-02-22T00:57:52+5:30
देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फसवणूक केली आहे.

नागपूरकर ग्राहकाची मेहुल चोकसीविरुद्ध तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फसवणूक केली आहे.
या प्रकरणात आयोगाने चोकसीला नोटीस बजावून दोन महिन्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तिक्कस यांनी गीतांजली इन्फ्राटेकच्या बोरिवली मुंबई येथील टाटवा गृह प्रकल्पात ३-बीएचके फ्लॅट बुक केला आहे. कंपनीने तिक्कस यांच्यासह १२० ग्राहकांकडून सुमारे २०० कोटी रुपये जमा केले. परंतु त्याने वेळेवर प्रकल्प पूर्ण केला नाही. त्यामुळे ग्राहकांना फ्लॅटस्चा ताबा मिळू शकला नाही. तिक्कस यांनी १ कोटी ६१ लाख रुपयांत फ्लॅट बुक करताना ८० टक्के रक्कम दिली. कर्ज घेतल्यामुळे त्यांना दर महिन्यात १.३० लाख रुपये मासिक हप्ता भरावा लागत आहे. कंपनीने प्रकल्पासाठी भोगवटा प्रमाणपत्र, इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी परवानग्या मिळविलेल्या नाहीत. ३१ डिसेंबर २०१५ ही डेडलाईन असताना प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही, असे तिक्कस यांचे म्हणणे आहे. तिक्कस यांच्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.