नागपूरच्या फरार गुंडाला आर्णीत अटक
By Admin | Updated: February 14, 2017 15:52 IST2017-02-14T15:52:31+5:302017-02-14T15:52:31+5:30
नागपूर येथील कुख्यात गुंड आणि कारागृहातून दोन वर्षांपासून फरार असलेल्या वसीम शि-याला यवतमाळमधील आर्णी येथे यात्रेदरम्यान अटक करण्यात आली.

नागपूरच्या फरार गुंडाला आर्णीत अटक
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 14 - नागपूर येथील कुख्यात गुंड आणि कारागृहातून दोन वर्षांपासून फरार असलेल्या वसीम शि-याला यवतमाळमधील आर्णी येथे यात्रेदरम्यान अटक करण्यात आली.
वसीम शि-या ऊर्फ शेख अफजल हा नागपूरच्या लकडगंज भागातील रहिवासी आहे. मोक्काअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. कारागृहातून त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. पण, यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. तो दोन वर्षांपासून फरार होता.
या काळात त्याने एका मित्रावर हल्ला केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून तो आर्णी येथील यात्रेत पत्नीसह आला होता. ९ फेब्रुवारीच्या रात्री दारू पिऊन त्याने पत्नीला यात्रेतच बेदम मारहाण केली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा पत्नीने त्याला पोलिसांच्या तावडीतून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन याबाबत विचारणा केली असता तिने वसीम शि-या हा दोन वर्षांपासून फरार असल्याचे पोलिसांना सांगितले. ते ऐकून आर्णी पोलिसतही चक्रावले.
त्याला लगेच अटक करून नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीष ताथोड यांच्या ताब्यात देण्यात आले. वसीम शि-या हा मूळचा अमरावती येथील रहिवासी आहे.