नागपूर : नागपूरकरांनो, घर-प्लॉट, फ्लॅटचे स्वप्न पाहताय तर आधी खरेदीच्या वेळी १ टक्का मेट्रो अधिभार भरावा लागेल. एकीकडे मागील काही वर्षांत जमिनीच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी, घरांच्याही किमती वाढल्या आहेत. त्यात आता नागपूर महापालिका क्षेत्रातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर १ एप्रिल २०२२ पासून मेट्रो अधिभार लागणार असल्याने खरेदी-विक्री आणखी महागणार आहे.
कोरोनाकाळात म्हणजे, सन २०२० मध्ये पुढील दोन वर्षे मेट्रो अधिभार लागू करण्यात येणार नसल्याचा निर्णय त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या महानगरांतील दस्तखरेदी, गहाणखत व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात कोरोनाकाळात दिलेल्या एक टक्का मेट्रो अधिभाराच्या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. ती वाढविण्याबाबत सरकारने निर्णय न घेतल्याने मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. राज्याचे सह निबंधक महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. यामुळे शहरात फ्लॅट वा प्लॉट खरेदी करताना ३० ते ५० हजारांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
मनपाची २९४ कोटींची मागणी
नागपूर शहरातील दस्तखरेदी, गहाणखत व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात एक टक्का मेट्रो अधिभाराच्या माध्यमातून राज्य सरकारने २९४ कोटींचा महसूल जमा केला आहे. वास्तविक महापालिकेला मेट्रो प्रकल्पात ५ टक्के वाटा उचलावयाचा आहे. ही रक्कम ४३४ कोटी होते. वास्तविक मनपाने मेट्रो प्रकल्पासाठी जागा उपलब्ध केली आहे. याची किंमत १ हजार कोटीहून अधिक होते. त्यामुळे मेट्रो अधिभाराच्या माध्यमातून राज्य सरकारने नागपुरात २०२० पर्यंत मेट्रो अधिभारातून जमा केलेला २९४ कोटींचा निधी मनपाला द्यावा, अशी मागणी मनपा सभागृहात करण्यात आली होती. मात्र, सरकारकडून हा निधी मिळालेला नाही.
घर व फ्लॅट ३० ते ५० हजारांनी महागणार
दस्तखरेदी, गहाणखत व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क सहा टक्के आकारले जाते. यात एक टक्का वाढ होणार असल्याने सात टक्के शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे नागपूर शहरात घर वा फ्लॅट खरेदी करावयाचा झाल्यास १ एप्रिल २०२० नंतर ३० ते ५० हजार हजार रूपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहे. यामुळे फ्लॅट व भूखंडाच्या किमतीत वाढ होणार आहे.