नागपुरी संत्रा श्रीलंकेला
By Admin | Updated: November 11, 2015 02:30 IST2015-11-11T02:30:16+5:302015-11-11T02:30:16+5:30
आपल्या आंबट-गोड चवीसाठी जगप्रख्यात असलेला ‘नागपुरी संत्रा’ पहिल्यांदाच श्रीलंकेला निर्यात होत आहे.

नागपुरी संत्रा श्रीलंकेला
‘महाआॅरेंज’चा पुढाकार : पहिला कंटेनर रवाना
नागपूर : आपल्या आंबट-गोड चवीसाठी जगप्रख्यात असलेला ‘नागपुरी संत्रा’ पहिल्यांदाच श्रीलंकेला निर्यात होत आहे. ‘महाआॅरेंज’ व पणन महामंडळाच्या पुढाकारातून ‘नागपुरी संत्र्या’चा पहिला कंटेनर धनत्रयोदशीच्या दिवशी (सोमवारी) मुंबईकडे रवाना झाला आहे. यानंतर मुंबईच्या बंदरातून तो पुढील १९ नोव्हेंबरपर्यंत श्रीलंकेच्या बाजारपेठेत दाखल होणार आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधनी मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ‘महाआॅरेंज’ला कारंजा घाडगे येथील संत्रा निर्यात केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले आहे. शिवाय नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकारातून ही निर्यात सुरू झाली आहे. सोमवारी आमदार आशिष देशमुख व रवींद्र ठाकरे यांनी कारंजा घाडगे येथून संत्र्याच्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी पूर्तीचे सुधीर दिवे, महाआॅरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे, संचालक मनोज जौंजाळ, दादाराव केचे, अशोक धोटे व प्रशांत कुकडे उपस्थित होते. ‘महाआॅरेंज’ने पहिल्या टप्प्यात २६ टन संत्री या कंटेनरमधून श्रीलंकेसाठी पाठविली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत संत्र्याचे भाव प्रचंड खाली घसरले आहेत. अशास्थितीत ‘महाआॅरेंज’च्या या प्रयत्नातून विदर्भातील संत्र्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माहिती सूत्रानुसार यापूर्वी नेपाळ, बांगलादेश व दुबई येथे मोठ्या प्रमाणात नागपुरी संत्रा निर्यात झाला आहे. परंतु मागील काही वर्षांत वाहतुकीच्या खर्चात प्रचंड वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी ती निर्यात थांबविली होती. परंतु आता ‘महाआॅरेंज’च्या पुढाकारातून तोच नागपुरी संत्रा पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. (प्रतिनिधी)