नागपूर जिल्हा परिषद : सभापतीच्या निवडीबद्दल संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:12 PM2020-01-29T23:12:47+5:302020-01-29T23:14:59+5:30

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची गुरुवारी निवड होणार आहे. पण सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

Nagpur Zilla Parishad: Confusion about the selection of the Speaker | नागपूर जिल्हा परिषद : सभापतीच्या निवडीबद्दल संभ्रम कायम

काँग्रेस जि.प. सदस्यांच्या बैेठकीत उपिस्थत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, आ. राजू पारवे, अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे.

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवारी होणार निवडणूक : राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर काँग्रेसची अजूनही चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची गुरुवारी निवड होणार आहे. पण सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे दोन सभापतींचा प्रस्ताव ठेवला आहे. पण सभापती ठरविण्याची वेळ तोंडावर आली असतानाही, काँग्रेसने अजूनही चुप्पीच साधली आहे. दोन्ही पक्षामध्ये सभापतीसाठी अनेक सदस्य इच्छुक आहे. दोन्ही पक्ष कुठल्याच निर्णयावर पोहचले नसल्यामुळे सभापतीच्या निवडीबद्दल संभ्रम कायम आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा यंदा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यंदा आघाडी करून लढल्यामुळे राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. पण काँग्रेसने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोन्ही पद स्वत:कडे ठेवले. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये मंत्री सुनील केदार यांच्या गटाची सरशी झालीे. परंतु जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या गटाचे सदस्य अजूनही प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीने दोन सभापतींचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. राष्ट्रवादीला दोन सभापतिपद दिल्यास काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस आता स्वकियांची नाराजी स्वीकारणार की मित्रपक्षाशी काडीमोड घेणार, हे सभापतींच्या निवड झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीने दोन सभापतींचा प्रस्ताव मान्य असेल तरच संपर्क करा, अशी भूमिका घेतली होती. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीला अजूनही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना गुरुवारी सकाळी रविभवनातील कॉटेजला बोलावण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व सदस्यांची बुधवारी रात्री बैठक ठेवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर काँग्रेसने निर्णय न घेतल्यास गुरुवारी राष्ट्रवादी भूमिका घेणार आहे.
दरम्यान सभापतिपदासाठी काँग्रेसमध्ये शांता कुमरे, नाना कंभाले, तापेश्वर वैद्य, कैलास राऊत, अवंतिका लेकुरवाळे, मेघा मानकर, मुक्ता कोक ड्डे, शंकर डडमल यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीमध्येही उज्वला बोढारे, चंद्रशेखर कोल्हे ही दोन नावे चर्चेत आहे.

असा आहे सभापती निवडीचा कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यालयाने सभापतीच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन समितीच्या सभापतिपदासाठी दोन सदस्यांची निवड खुल्या प्रवर्गातून होणार आहे. एक सभापती अनुसूचित जाती अथवा जमाती तर एक सभापती महिला सदस्यांमधून निवडण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी ११ ते १ या काळात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ३.१५ पर्यंत अर्जाची छाननी, पुढचा अर्धा तास नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी वेळ दिली आहे. आवश्यकता असल्यास ४.१५ वाजता निवडणूक होणार आहे. यासाठी निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी नियुक्त केला आहे.

 

Web Title: Nagpur Zilla Parishad: Confusion about the selection of the Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.