नागपुरात महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:07 IST2018-09-27T13:05:54+5:302018-09-27T13:07:10+5:30
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली.

नागपुरात महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी मयूर शिंदे (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अश्विनी मूळची बीड येथील रहिवासी होय. त्या डीओआरएल अभ्यासक्रमासाठी नागपुरात आल्या होत्या. मेडिकल परिसरातील मार्डच्या होस्टेलमध्ये ४२ क्रमांकाच्या रूममध्ये त्या राहत होत्या. डॉ. श्रुती तागडे आणि अन्य एक अशा दोन मैत्रिणी त्यांच्या सोबत राहायच्या. गुरुवारी सकाळी १० वाजले तरी डॉ. अश्विनी व्याख्यानाला (लेक्चरला) पोहचल्या नाही. त्यामुळे डॉ. श्रुती त्यांच्या रूमवर गेल्या. दार आतून बंद असल्यामुळे बराच वेळेपर्यंत त्यांनी दार ठोठावले. कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजुच्या खिडकीतून त्यांनी डोकावून बघितले असता अश्विनी पलंगावर पडून दिसल्या. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. त्यामुळे डॉ. श्रुती यांनी आरडाओरड करून बाजुच्यांना गोळा केले. होस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. गंभीर अवस्थेतील डॉ. अश्विनी यांना तातडीने अतिदक्षता विभागात नेण्यात आले. त्यांनी स्वत:चा गळा सर्जिकल ब्लेडने कापून घेतल्याचा अंदाज आहे. बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची अवस्था चिंताजनक आहे. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्यावर उपचार सुरू असून, अजनीचे पोलीस निरीक्षक शैलेष संख्ये तसेच त्यांचे सहकारी घटनेची चौकशी करीत आहेत. या घटनेमुळे मेडिकल परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.