सिकलसेल आजारावर नागपुरात होणार मंथन
By Admin | Updated: May 22, 2015 01:52 IST2015-05-22T01:52:24+5:302015-05-22T01:52:24+5:30
सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने २१ जून रोजी नागपूर येथे कार्यकर्ता मेळावा.

सिकलसेल आजारावर नागपुरात होणार मंथन
अकोला:सिकलसेल या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार कसे करता येतील, यासंदर्भात नागपूर येथे संबंधित आजारावर जनजागृती करणारे कार्यकर्ते मंथन करणार असून, जागतिक सिकलसेल दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी नागपूर येथे सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला या सोसायटीचे राज्यभरातील विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष व कार्यकर्त्यांंची उपस्थिती राहणार आहे. नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये सिकलसेलसारख्या क्लिष्ट आजाराचे असंख्य रुग्ण आहेत. मराठवाड्यातील नंदूरबार जिल्ह्यापासून ते पश्चिम विदर्भातदेखील या गंभीर आजाराची पाळेमुळे पसरत चालली आहेत. पूर्व विदर्भात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असताना उपचाराचे केंद्र नागपूर ऐवजी मुंबईमध्ये कार्यान्वित आहे. परिणामी, विदर्भातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागत असून, ही बाब खर्चिक तसेच अशक्यप्राय असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत सिकलसेलच्या रुग्णांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला तरी त्याचा लाभ मात्र रुग्णांना होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून नागपूरस्थित सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संबंधित रुग्णांपर्यंंत पोहोचून त्यांना उपचार पुरविल्या जात आहेत. २0१४ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या संस्थेने सिकलसेलच्या रुग्णांना एसटीद्वारे मोफत प्रवास करण्याचा प्रश्न लावून धरला असता, शासनाने हिरवी झेंडी दिली. आरोग्य विभागाने १0 मार्च रोजी तसा अध्यादेशही लागू केला; परंतु यासंदर्भात अडीच महिन्यांच्या कालावधीतही एसटी महामंडळाने कोणतीही उपाययोजना केली नाही. राज्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांपर्यंंत पोहोचवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाने राज्यभरात विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकारिणी तयार केली. येत्या १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिन असून, त्यानिमित्त २१ जून रोजी मोर भवन झाशी राणी चौक येथे राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोसायटीने केले आहे.