नागपूर देशात ‘स्मार्ट मॉडेल’ ठरेल
By Admin | Updated: April 8, 2017 02:41 IST2017-04-08T02:41:32+5:302017-04-08T02:41:32+5:30
स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतर काही महिन्यातच नागपूर शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली.

नागपूर देशात ‘स्मार्ट मॉडेल’ ठरेल
नंदा जिचकार : स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेचे उद्घाटन
नागपूर : स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतर काही महिन्यातच नागपूर शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली. स्मार्ट स्ट्रीट व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प मार्गदर्शक ठरत आहेत. एवढेच नव्हे तर स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या देशभरातील अन्य शहरासांठी नागपूर ‘स्मार्ट मॉडेल’ ठरेल असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
नागपूर महापालिकेतर्फे व इलेटस टेक्नो मीडिया प्रा.लि यांच्या सहकार्याने नागपुरात आयोजित दोन दिवसीय स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, महापालिके तील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर, बार्सिलोनाचे माजी उपमहापौर अॅन्थोनी विवस थामस, विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अरुण लखानी, सिस्कोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर, फिलीप्स लायटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष चितळे, बँक आफ महाराष्ट्रचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.व्ही पुजारी, एनसीसीचे संचालक रघु अल्लोरी, इलिट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता आदी उपस्थित होते.
महापालिकेने स्मार्ट वाहतूक, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने कार्य सुरू केले आहे. यात अन्य शहरांच्या तुलनेत नागपूरने आघाडी घेतली आहे. शिखर संमेलनातून स्मार्ट सिटी प्रकल्पाला दिशा मिळणार आहे. याचा लाभ देशभरातील शहरांना होईल असा विश्वास नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. संमेलनात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रतिनिधींचे त्यांनी स्वागत केले. व्ही.के.गौतम यांनी स्मार्ट सिटीमधील डिजिटायझेशनवर प्रकाश टाकला, तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पात कशाप्रकारे केला जातो. तसेच नागपुरात तो कशाप्रकारे अमलात आणला जाणार याची माहिती दिली.
वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरा, सेन्सर लाईट्स, रस्ते म्हणजेच स्मार्ट सिटी नव्हे, तर शहरातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, तसेच नागरी सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला तरच खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल, असे मत अॅन्थोनी थॉमस यांनी व्यक्त केले.
अरुण लखानी म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून अनेक महत्त्वाचे प्रकल्प नागपुरात आकारास येत आहेत. पीपीपीमध्ये आता चौथा ‘पी’ जोडायचा आहे आणि तो म्हणजे पब्लिकचा ‘पी’आणि या चार पी मॉडेलचे आपण भागीदार असल्याचा आपल्याला अभिमान आहे.
अनिल नायर, फिलिप्स लाईटिंगचे सीईओ हर्ष चितळे, बॅँक आफ महाराष्ट्राचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.व्ही. पुजारी, एनसीसीचे संचालक रघु अल्लोरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषद म्हणजे विचारांचे आदानप्रदान आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने उत्तम व्यासपीठ असल्याच श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रारंभी नंदाताई जिचकार व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. नागपूरवर आधारित इ-गव्हर्नन्स इलिट्सच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आभार रवी नायर यांनी मानले.(प्रतिनिधी)