पाण्यात नागपूर
By Admin | Updated: July 23, 2014 00:57 IST2014-07-23T00:57:13+5:302014-07-23T00:57:13+5:30
लागोपाठ दुसऱ्या मंगळवारी शहरात जोराचा पाऊ स झाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नाल्या कचरा व गाळाने बुजल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले, अनेक वस्त्यात दोन-तीन फूट पाणी साचले होते.

पाण्यात नागपूर
नागपूर : लागोपाठ दुसऱ्या मंगळवारी शहरात जोराचा पाऊ स झाला. लोकांच्या घरात पाणी शिरले. नाल्या कचरा व गाळाने बुजल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले, अनेक वस्त्यात दोन-तीन फूट पाणी साचले होते. पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही सर्वत्र चांगला पाऊ स झाला. हिंगणा तालुक्यात सर्वाधिक ६० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. बाबा दीपनगर येथील नरेंद्रसिंग तोमर यांच्या घरात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी पंप लावून घरातील पाणी काढले. पार्वतीनगरातील पोस्ट आॅफिसजवळील पावसाळी नाली बुजल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरले होते. नमकगंज पोलीस चौकीजवळ गडर लाईन तुंबल्याने पाणी लोकांच्या घरात शिरले होते. पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली होती. तसेच पाच मंदिर शाहू मोहल्ला येथील घरात पाणी शिरले होते. शांतीनगर हनुमान मंदिर परिसरात पाणी साचल्याने लोकांना त्रास झाला. शहरात पाणी तुंबण्यासोबतच पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. काटोल मार्गावरील पोलीस लाईन टाकळी येथे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
चिंचभवन
उन्हाळ्यात कोरडा पडलेला चिंचभवनमधील नाला पावसाने तुडुंब भरला आहे. या भागातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वस्त्यांना तलावाचे स्वरूप आले तर रस्त्याला खेटून असलेल्या घरात पाणी शिरले. सखल भागातील इमारतींच्या तळघरात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. महापालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष आहे. अंतर्गत रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने व आता त्यावर पाणी साचल्याने त्यावरून चालताना नागरिकांना तारेवरची कसरतच करावी लागते. वीज उपकेंद्राजवळच्या मोकळ्या जागेवर कचरा टाकला जातो. पावसामुळे तो सडण्याची शक्यता आहे. त्यातून रोगाची साथ पसरू शकते. हे येथे उल्लेखनीय.
फ्रेन्डस् कॉलनी
फे्रन्डस्् कॉलनी परिसरातील नागरिकांना संततधार पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला. वीरचक्र कॉलनी, केजीएन सोसायटी, वृंदावन कॉलनी व कालीमंदिरशेजारी मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. तसेच वृंदावन कॉलनीमधील नाल्याचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. या परिसरात अनेक नवीन ले-आऊट टाकण्यात आले आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अजूनपर्यंत पक्के रस्ते तयार झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शिवाय खाली प्लॉटमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.
धरमपेठ
धरमपेठ परिसरातील कॅनल रोडवर दुपारी ३ वाजताच्या सुमारास एक मोठे झाड एका महागड्या कारवर कोसळले. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय त्या झाडामुळे टिळकनगरकडून झेंडा चौकाकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. त्याचा लोकांना चांगलाच फटका सहन करावा लागला. उशिरापर्यंत ते झाड रस्त्यावर तसेच पडून होते. धरमपेठ ही मुख्य बाजारपेठ आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
गिट्टीखदान
गिट्टीखदान परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. मानवतानगर, शीलानगर, कुतुबशहानगर वस्त्यांमध्ये जिकडेतिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसून येत होते. अनेकांच्या घरांपुढे गुडघाभर पाणी साचले होते. त्यात अनेकांच्या दुचाकी अर्ध्यापेक्षा अधिक बुडाल्या होत्या.
कामठी रोड
कामठी रोडवरील आॅटोमोटिव्ह चौक ते पिवळी नदी परिसरापर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. यातच दोन्ही भागात जड वाहने उभी राहतात. या मार्गावर पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे चुकवित वाहन चालविणे धोकादायक झाले आहे. या मार्गावर ग्रामीण आरटीओ कार्यालय आणि इंदोरा वाहतूक पोलीस कार्यालय असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सदर
सदर माऊंट रोडवर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गुडघाभर पाणी साचले होते. वाहनात पाणी गेल्याने अनेक दुचाकी बंद पडल्या. पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती, नंतर वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली. अशीच स्थिती सिव्हील लाईन परिसरात होती.
जरीपटका
जरीपटकामधील सीएमपीडीआय रोड, के.सी. बजाज कॉलेजच्या रेल्वे लाईनला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. येथील नागरिकांच्या मते, रेल्वे परिसरातून निघालेल्या नाल्याची सफाई होत नाही. यामुळे नाला तुंबतो. याचा फटका रहिवाशांना बसतो. देवा माने, बबन यादव, विनोद साळवे आणि गणेश चांदेकर यांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्याची नासाडी झाली आहे.
हुडकेश्वर
हुडकेश्वर येथून गेलेल्या पवनसुतनगरच्या नाल्यालगत वस्त्यांमध्ये पाणी शिरले. या नाल्यात अनेकांनी आपल्या सिवर लाईन जोडल्या आहेत. नाला दुथडी भरून वाहत असल्याने अनेकांच्या या लाईन तुंबल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पाहता कधीही मोठा धोका होण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. येथील कच्चे रस्ते पावसाने वाहून गेले आहेत.
झाडे पडली
लेडीज क्लबच्या बाजूला झाड पडल्याची सूचना अग्निशमन विभागाला दिली होती. परंतु विभागाचे जवान घटनास्थळी पोहचले असता झाड झुकल्याचे निदर्शनास आले. अंध विद्यालयाच्या बाजूला माता कचेरी येथे सोमवारी रात्री उशिरा झाड पडले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झाड कापून त्याची विल्हेवाट लावली. राजभवनाच्या मुख्य इमारतीजवळ झाड पडले होते. सुजातानगर येथील प्लॉट क्र . ११७ येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची स्लॅब कोसळली सुदैवाने यात प्राणहानी झाली. अन्य मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. गेल्या मंगळवारी उद्भवलेली परिस्थिती आजही काही वस्त्यात उद्भवली होती. अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होईल अशा ६६ ठिकाणाकडे अग्निशमन विभाग नजर ठेवून आहे.
न्यू नेहरूनगर
महापालिकेच्या नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या मानेवाडा रोडवरील न्यू नेहरूनगर वसाहतीत आठवड्यापूर्वी पावसाचे पाणी शिरले होते. याची तक्रार त्यांनी संबंधित झोनकडे केली होती, परंतु विशेष उपाययोजना झाली नसल्याने मंगळवारी पुन्हा पाणी शिरले. दिवसभर चाललेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात गुडघाभर पाणी साचून होते. यामुळे अन्न-धान्याची नासाडी झाली. किशोर धनविजय, महेंद्र प्रसाद, अनिल पाटील, सचिन तोडसी, कृष्णा शंभरकर, देवीदास खोब्रागडे आदींना याचा मोठा फटका बसला.
यशोधरानगर
यशोधरानगर पोलीस ठाण्यासमोरील मेहबूबनगर येथील नाल्याला पूर आला. विशेष म्हणजे या नाल्याला कठडे नाहीत. यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाच नाला समोर वसाहतीतून जातो. या नाल्याचे पाणी वसाहतीत शिरल्याचे शैलेश गडपायले यांनी सांगितले, उन्हाळ्यात या नाल्याची सफाई होत नाही. यातच हा नाला अरुंद आहे. संरक्षक भिंत नाही. नागमोडी वळण घेत हा नाला समोर गेल्याने जोराचा पाऊस आला तरी हा नाला भरतो. जीवित हानी झाल्यावरच प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
पार्वतीनगर
रामेश्वरी बसथांब्याच्या मागील पार्वतीनगरातील ओळ क्र. २ मध्ये दिवसभर पावसाचे पाणी साचून होते. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. या भागात टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन निकृष्ट दर्जाची आणि चुकीच्या पद्धतीची आहे. काही ठिकाणी ही लाईन फुटली देखील, यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता साचून राहते. येथील नागरिकांनी संबंधित झोनकडे या संदर्भात तक्रार केली आहे, परंतु कोणीच याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आहे.
व्यंकटेशनगर
मुसळधार पावसाचा फटका दरवर्षी खामला येथील व्यंकटेशनगरातील लोकांना बसतो. मंगळवारी झालेल्या पावसामुळे गटारी तुंबून रस्त्यावरील व गडरलाईनची घाण वसाहतीत शिरली. विशेष म्हणजे, या भागात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे काम मंजूर आहे. परंतु अतिक्रमणामुळे काम रखडले आहे. पावसाच्या पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने लोकांच्या घरात पाणी शिरते. नालीचे काम तातडीने करावे अशी मागणी देवेंद्र वानखेडे यांच्यासह त्रस्त नागरिकांनी केली.