नागपूर-वर्धा ‘फोर्थ रेल्वे लाईन’
By Admin | Updated: May 20, 2016 02:45 IST2016-05-20T02:45:09+5:302016-05-20T02:45:09+5:30
आता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत.

नागपूर-वर्धा ‘फोर्थ रेल्वे लाईन’
तिसऱ्या लाईनसोबतच होणार काम : अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार होतोय
वसीम कुरैशी नागपूर
आता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम वेगात सुरू असून चौथ्या लाईनचे काम यासोबतच करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे चौथ्या लाईनसाठी अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार केला जात आहे.सध्याच्या दोन लाईनवर केवळ २०० रेल्वेगाड्या चालविल्या जाऊ शकतात पण, सध्या सुमारे ३२५ रेल्वेगाड्या धावत आहेत.
नागपूर-वर्धा हा मध्य रेल्वेचा बॉटल नेक मार्ग म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनमुळे या मार्गावरील दबाव पुढील अनेक वर्षांसाठी कमी होईल. सूत्रानुसार चौथ्या लाईनला किमान ६०० कोटी रुपये खर्च लागू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चौथ्या लाईनचे काम सुरू होऊ शकते. या मार्गावर असलेला रेल्वेगाड्यांचा दबाव व भविष्यातील योजना लक्षात घेता चौथी लाईन टाकण्याच्या दिशेने वेगात पावले उचलली जात आहेत. दोन वर्षांपूर्वी तिसरी लाईन टाकण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नागपूर-नागभीड नॅरोगेज लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित केल्यानंतर नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची गरज उरणार नाही असे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु, अनेक अडचणीनंतर तिसऱ्या लाईनचा मार्ग मोकळा झाला. आता चौथ्या लाईनचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेमार्ग अनुपलब्ध असण्याचा फटका मालगाड्यांना नेहमीच सहन करावा लागतो. चौथी लाईन पूर्ण झाल्यानंतर मालगाड्यांच्या वाहतुकीस गती मिळेल.
यातून रेल्वेच्या उत्पन्नात वृद्धी होईल. प्रवासी गाड्यांपेक्षा मालगाड्यांच्या माध्यमातून रेल्वे मंडळाला जास्त महसूल मिळतो. याशिवाय नागपूर-वर्धा मार्गावर दुप्पट संख्येने गाड्या धावत असल्यामुळे रेल्वेलाईनच्या देखभालीसाठी जास्त वेळ मिळत नाही. यातच रेल्वेलाईनची देखभाल करणाऱ्या ट्रॅकमॅनची संख्या कमी आहे. अनेक ट्रॅकमॅन व गँगमॅन अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर काम करीत असतात. चौथ्या लाईनमुळे देखभालीची समस्याही दूर होईल.(प्रतिनिधी)
तिसऱ्या लाईनचा खर्च दुप्पट
तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी २०१२-१३ या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची घोषणा केली होती. या योजनेवर त्यावेळी २९७. ८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, कामास विलंब केल्यामुळे योजनेचा खर्च वाढून ५०० कोटी रुपये झाला आहे. अजनी, खापरी, गुमगाव, बुटीबोरी, बोरखेडी, सिंदी, तुळजापूर, सेलू, वरुड इत्यादी गावांवरून जाणारा हा मार्ग ७६.३ किलोमीटर लांब आहे. या मार्गावर २३ मानवरहीत रेल्वेगेट आहेत. तिसऱ्या लाईनसाठी खापरी व जामठ्याजवळ लहान पूल बांधण्यात आले आहेत. धाम नदी व किस्तना नदीवर मोठे पूल बांधण्यात येत आहेत. चौथ्या लाईनसाठीही एवढेच पूल बांधले जातील. तिसऱ्या लाईनच्या योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण २०१३ मध्येच पूर्ण झाले होते. परंतु, प्रत्यक्ष कामाला गेल्यावर्षीपासून सुरुवात झाली.