नागपूर विद्यापीठाच्या रेकॉर्ड रूमला उधळी

By Admin | Updated: April 10, 2015 02:13 IST2015-04-10T02:13:27+5:302015-04-10T02:13:27+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रेकॉर्डरूमला उधळी लागल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Nagpur University records room dirty | नागपूर विद्यापीठाच्या रेकॉर्ड रूमला उधळी

नागपूर विद्यापीठाच्या रेकॉर्ड रूमला उधळी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रेकॉर्डरूमला उधळी लागल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. उधळीमुळे कामठी येथील वादग्रस्त समाजकार्य महाविद्यालयाची कागदपत्रे नष्ट झालीत, असे पत्र सहायक कुलसचिव (लेखा) यांनी दिल्याचे प्रा. सुनील मिश्रा यांनी हायकोर्टात सांगितले आहे.
मिश्रा यांनी हायकोर्टात दिवाणी अर्ज दाखल करून लॉर्ड बुद्धा सारीपुत्र ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेद्वारे संचालित हे महाविद्यालय अवैध असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांचे हे महाविद्यालय असून ते १९९४-९५ पासून सुरू आहे. मिश्रा यांनी या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी करण्यात आलेला अर्ज, अर्जासोबत भरलेल्या शुल्काची पावती, दैनंदिन व मासिक वसुली नोंदवही इत्यादी कागदपत्रे माहितीच्या अधिकारात मागितली होती. न्यायालयाने मिश्रा यांना आवश्यक ती कागदपत्रे कायद्यानुसार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सहायक कुलसचिव (लेखा) यांनी दिलेल्या पत्रात उधळीची माहिती नमूद करण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले आहे.
हे प्रकरण गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता मिश्रा यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले. विद्यापीठाच्यावतीने सतत विसंगतीपूर्ण माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यापीठाच्या रेकॉर्डरूमची तपासणी करण्याची परवानगी मागितली. विद्यापीठाने यास सहमती दर्शविल्यानंतर न्यायालयाने मिश्रा यांना रेकॉर्डरूमची तपासणी करण्यास सांगितले. लॉर्ड बुद्धा सारीपुत्र ज्ञान प्रसारक संस्थेला याप्रकरणात मध्यस्थी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन आॅफ नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणावर १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मिश्रा यांनी स्वत:, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, संस्थेतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भंडारकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Nagpur University records room dirty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.