Nagpur University: Confusion over 'app' due to security | नागपूर विद्यापीठ : सुरक्षेवरून ‘अ‍ॅप’बाबत संभ्रम

नागपूर विद्यापीठ : सुरक्षेवरून ‘अ‍ॅप’बाबत संभ्रम

ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक म्हणतात, अ‍ॅप सुरक्षितच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अ‍ॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसेच अ‍ॅप धोकादायक असल्याच्या अफवेवरुन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. संबंधित अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केला आहे. विद्यापीठाच्या सर्व्हरमध्ये सर्व डाटा सुरक्षित आहे. त्यामुळे तो लीक होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आरटीएमएनयू परीक्षा हे मोबाईल अ‍ॅप हे प्लेस्टोअरवर उपलब्ध नसून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एपीके प्रकारात हे देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना ही फाईल डाऊनलोड करता येऊ शकते. यासंदर्भात नेमक्या काय तांत्रिक बाबींवर भर द्यायचा याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. एपीके प्रकारातील हे अ‍ॅप असल्याने धोक्याची सूचना विद्यार्थ्यांना येते. मात्र यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमित होण्याची किंवा घाबरून जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही. याबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाने माहितीपत्रिकेत दिला आहे. मोबाईल स्क्रीनवर संदेश येत असला तरी हे अ‍ॅप सुरक्षित असल्याचा दावा डॉ.साबळे यांनी केला आहे.

गाईडलाईन पूर्ण वाचा
या अ‍ॅपसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर बोलताना डॉ. साबळे म्हणाले, अ‍ॅप लॉन्च करण्यासोबतच ते डाऊनलोड कसे करावे याची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्या वाचायला हव्या. त्यातूनच त्यांना यासंदर्भात तांत्रिक माहिती मिळेल. मात्र अनेक विद्यार्थी या सूचना न वाचताच अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढतो आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्व्हरवरील ताण वाढला
विद्यापीठाच्या परीक्षा अ‍ॅपची गती फार कमी असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. अ‍ॅप योग्यपणे काम करत नसल्याच्याही तक्रारी आहेत. यावर प्रतिक्रिया देताना डॉ. साबळे म्हणाले, विद्यापीठाच्या अंतिम वर्ष व सेमिस्टरच्या परीक्षेला ७० हजार विद्यार्थी आहेत. परंतु अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या मात्र ३ लाखावर आहे. यामुळे सर्व्हरवरील लोड वाढल्याने वेगही मंदावला आहे. मात्र यामुळे परीक्षेदरम्यान काहीही समस्या निर्माण होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Nagpur University: Confusion over 'app' due to security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.