Nagpur University: Confusion about exams has increased | नागपूर विद्यापीठ : परीक्षांबाबत आता संभ्रम आणखी वाढीस

नागपूर विद्यापीठ : परीक्षांबाबत आता संभ्रम आणखी वाढीस

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. विद्यापीठ वर्तुळातील अनेकांनी परीक्षा घेण्याचे स्वागत केले असले तरी प्रशासनाचे संपूर्ण लक्ष राज्य शासनाकडे लागले आहे. राज्य शासनातर्फे मात्र मंगळवारी परीक्षा नकोच अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन कोणता ठोस निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
‘कोरोना’मुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अगोदरच्या सत्रांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिशानिर्देश जारी करुन सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना केल्या तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र पाठवून परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका मांडली.
या सर्व घटनाक्रमामुळे नागपूर विद्यापीठ वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना विचारणा करण्यात येत आहे, तर शिक्षकांकडून विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. विद्यापीठ स्वायत्त संस्था असली तरी परीक्षांसंदर्भात विद्यापीठाकडून राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंधळ आणखी वाढीस लागला आहे.

सध्या ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका
विद्यापीठ अनुदान आयोगाचे दिशानिर्देश जारी झाले असले तरी राज्य शासनाकडून विद्यापीठाला अद्याप कुठलेही निर्देश आलेले नाहीत. परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चीच भूमिका घेतली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असे प्रतिपादन प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी केले.

परीक्षा घेण्याची तयारी, पण...
जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर विद्यापीठाची परीक्षेची तयारी असेल. परंतु त्यासाठी मोठ्या आव्हानांचादेखील सामना करावा लागेल. अनेक विद्यार्थी गावांकडे गेले आहेत. बस व रेल्वे सेवा सुरू होत नाही तोपर्यंत ते परतू शकणार नाहीत. शिवाय नागपूर विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवणे कठीण होईल. पर्यायाने परीक्षा केंद्र वाढवावी लागतील. त्यासाठी महाविद्यालयांना तयार करणे हे जिकीरीचे काम असेल. शिवाय परीक्षा झाल्या तर निकालांना विलंब होईल व त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया आॅक्टोबरनंतरच राबवावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Nagpur University: Confusion about exams has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.