नागपूर टोलमुक्त

By Admin | Updated: April 11, 2015 02:19 IST2015-04-11T02:19:49+5:302015-04-11T02:19:49+5:30

राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘टोलमुक्ती’मध्ये नागपूरच्या सीमेवर असणाऱ्या सर्वच टोल नाक्यांचा समावेश असल्याने

Nagpur toll-free | नागपूर टोलमुक्त

नागपूर टोलमुक्त

सहा नाक्यांचा समावेश: वाहनधारकांना दिलासा
नागपूर:
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘टोलमुक्ती’मध्ये नागपूरच्या सीमेवर असणाऱ्या सर्वच टोल नाक्यांचा समावेश असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून टोलमुळे आर्थिक भूर्दंड सहन करणाऱ्या छोट्या वाहनधारकांना (कार,जीप किवा तत्सम) दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे परिसरातील इतर जिल्ह्यांतून नागपूर शहरात येणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत १२ टोल नाके कायमचे बंद तर ५३ टोल नाक्यांमधून छोट्या वाहनांना टोलमधून वगळण्याची घोषणा केली. यामुळे नागपूरच्या सीमेवर असणारे पाच आणि जिल्ह्यातील एक अशा एकूण सहा टोल नाक्यांवर १ जूनपासून छोट्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. यात नागपूर-काटोल, नागपूर-उमरेड, नागपूर -हिंगणा रोड, हिंगणा रोड-अमरावती रोड, वाडी जंक्शन -नागपूर, आणि काटोल येथील टोल नाक्याचा समावेश आहे. यापैकी पहिले पाच नाके हे रस्ते विकास महामंडळाचे असून काटोलचा नाका हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. रस्ते विकास महामंडळाचे टोल नाके सुरू राहतील पण त्यावर हलकी वाहने आणि एस.टी.ला टोल लागणार नाही. काटोल येथील पीडब्ल्युडीचा टोल नाका बंद होणार आहे.
नागपूर शहराच्या सीमेवर असणाऱ्या टोलनाक्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: शेतकऱ्यांना भूर्दंड बसत होता. शहराच्या सीमेबाहेर अनेकांचे शेत आहे. शेतकऱ्यांना शहरात शेतमाल विकण्यासाठी जावे लागते. या सर्वांना टोलचा भूर्दंड बसत होता. नजिकच्या वर्धा, अमरावती, काटोल आणि इतर तत्सम ठिकाणांहून स्वत:च्या वाहनाने येणाऱ्यांचीही सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)

येथे लागणार नाही टोल
नागपूर-काटोल
नागपूर-उमरेड
नागपूर -हिंगणा रोड
हिंगणा रोड-अमरावती रोड
वाडी जंक्शन -नागपूर
काटोल- जलालखेडा

Web Title: Nagpur toll-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.