लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्र्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध असलेली उपराजधानी आज नशेच्या दुर्गंधीने वेढली गेलीय. 'एमडी', चरस, गांजा, ई-सिगारेट्ससारख्या घातक अमली पदार्थाचे सर्वात मोठे ट्रान्झिट हब म्हणून नागपूरचे नाव आता मध्य भारताच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे. मुंबई-दिल्लीहून येणाऱ्या घातक अमली पदार्थाचा खेपा, महाविद्यालयीन पेडलर्सची श्रृंखला, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले जाळे आणि सोशल मीडियातून चालणाऱ्या व्यवहारांची अदृश्य दुनिया, हे सर्व मिळून नागपूरच्या तरुण पिढीवर मृत्यूचे सावट घट्ट करत आहेत.
नशेची अंडरग्राउंड अर्थव्यवस्था इतकी बेभान झाली आहे की, नागपूरलगतच्याच वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथे थेट 'एमडी' तयार करणारा कारखाना उभारण्याचे धाडस तस्करांनी केली. महसूल गुप्तचर संचालनालयाने हा अड्डा उद्ध्वस्त केला, मात्र या नशा साम्राज्याच्या खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोलिसही पोहोचू न शकल्याने 'ब्लाइंड स्पॉट' अधिकच रुंदावत असल्याने ड्रग्सचा हायवे थेट नागपुरातून मध्य भारतात पोहचला आहे.
मुंबईजवळील भिवंडी, बदलापूर, ठाणे-नाशिकजवळील काही जुन्या फॅक्टरीजला प्रयोगशाळेत बदलून तेथे 'एमडी'चे उत्पादन केले जाते. तेथून 'एमडी'ची नागपुरात विविध मार्गानी डिलिव्हरी होते. नागपुरातील मोठ्या तस्करांच्या हाताखाली अनेक 'पेडलर्स' काम करतात. यातील काही 'पेडलर्स', तर सुशिक्षित व अगदी चांगल्या घरातील आहेत. हे 'पेडलर्स' लहान पंटर्सच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत 'डिलिव्हरी' करतात. केवळ नागपूरच नव्हे तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, मध्य प्रदेशातील छिंदवाडा, जबलपूरपर्यंत नागपुरातूनच 'डिलिव्हरी' होते. या तस्करांनी 'स्लीपर सेल्स' देखील तयार करून ठेवले आहे. नेमका माल कुठून येतो हे या लहान पंटर्सला माहितीच नसते. यामुळे नागपुरातील प्रमुख सूत्रधार व बाहेरील पुरवठादार हे 'सेफ' होतात.
ओडिशा-दक्षिणेतून 'गांजा एक्स्प्रेस'
शहरात येणारा गांजा हा प्रामुख्याने ओडिशा व दक्षिणेतील राज्यांतून येतो. यासाठी तस्करांच्या नेटवर्ककडून कधी रेल्वे मार्ग, तर कधी रस्ता मार्गाचा वापर करण्यात येतो. रस्त्याने माल आणत असताना कधी भाजी तर कधी धानाच्या मालाच्या आड गांजाची खेप येते. याशिवाय तस्करांकडून रेल्वेचादेखील वापर करण्यात येतो. काही पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हावडा रेल्वे मार्ग जातो. अनेकदा लहान बॅग किंवा पिशव्यांमध्ये तस्कर माल भरून आणतात. अनेक तस्कर ओडिशातून येणाऱ्या गांजाची पोती बेले नगरसारख्या भागाजवळ चालत्या ट्रेनमधून फेकून देतात. रुळाजवळ उभे असलेले आरोपी नाल्यांमध्ये पोती लपवतात. योग्य वेळ पाहून ते पोती पुढे नेतात. त्यानंतर हा माल विदर्भातील इतर भागांत पाठविण्यात येतो.
'ड्रग्ज'चे 'हॉट स्पॉट्स'
नागपूरच्या 'व्हाईट कॉलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगर, धरमपेठ, अंबाझरी, शंकरनगर, गोकुळपेठ, रामनगर या भागांत काही कॅफेच्या आड मोठ्या प्रमाणात अनधिकृत हुक्का पार्लर्स फोफावत आहेत. बाहेरून सुबक, शांत आणि ट्रेंडी दिसणाऱ्या या कॅफेची आतली खोली मात्र तरुणांना धुराच्या दरीत ढकलणारी आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे इथे अल्पवयीन मुलं-मुलीही सर्रासपणे दिसतात.
Web Summary : Nagpur emerges as a major drug transit hub, with MD, charas, and ganja flowing through it. Traffickers establish MD factories nearby, supplying drugs via networks to other Vidarbha districts and Madhya Pradesh. Railway and road routes are used to transport narcotics, with college students acting as peddlers.
Web Summary : नागपुर एक प्रमुख ड्रग ट्रांजिट हब के रूप में उभरा है, जहाँ से एमडी, चरस और गांजा बह रहा है। तस्करों ने पास में ही एमडी कारखाने स्थापित किए हैं, जो अन्य विदर्भ जिलों और मध्य प्रदेश में नेटवर्क के माध्यम से ड्रग्स की आपूर्ति करते हैं। रेलवे और सड़क मार्गों का उपयोग मादक पदार्थों के परिवहन के लिए किया जाता है, कॉलेज के छात्र पेडलर के रूप में काम करते हैं।