सायबर गुन्हेगारांचे टार्गेट नागपूर ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:33+5:302021-02-13T04:09:33+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांची ...

Nagpur is the target of cyber criminals. | सायबर गुन्हेगारांचे टार्गेट नागपूर ।

सायबर गुन्हेगारांचे टार्गेट नागपूर ।

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूरला सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांची नाडवणूक करून निर्ढावलेल्या या भामट्यांनी आता थेट हायप्रोफाईल आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींनाही लक्ष्य केले आहे. निवृत्त न्यायाधीश, डॉक्टर, वकील, पोलीस आयुक्त, पत्रकार आणि आता या भामट्यांनी माजी मंत्र्यांच्या फेसबुक आयडीला हॅक करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न चालविल्याने सायबर गुन्हेगारांची दहशत तीव्र झाली आहे.

झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, नोएडा मध्ये बसून बँक अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या या भामट्यांनी प्रारंभी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा बँक अकाउंटचे डिटेल्स घेऊन सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारणे सुरू केले होते. नंतर केवायसी आणि लॉटरी, रोजगार, गिफ्ट, कर्जाची थाप मारून ते रक्कम उकळू लागले. कोरोनाचा कहर सुरू असताना सायबर गुन्हेगारांचाही हैदोस सुरूच होता. वर्षभरात त्यांनी नागपुरातील निवृत्त न्यायाधीश, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी अशा ३५०० जणांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. सायबर गुन्हेगारांना मुसक्या आवळण्याची भीती वाटत नसल्याने ते कमालीचे निर्ढावले आहेत. त्यामुळे आता त्यांनी थेट फेसबुक आयडीच हॅक करणे सुरू केले आहे. गेल्या तीन महिन्यात त्यांनी उच्चभ्रू आणि महत्वाच्या पदावर कार्यरत असणारांना लक्ष्य केले आहे. फेसबुक आयडी हॅक किंवा क्लोन करून ते त्यात आपला मोबाईल नंबर तसेच गुगल पे अकाउंट नंबर नमूद करतात. संबंधित व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये कॉमन मेसेज पाठवतात आणि त्यांना पैशाची मागणी करतात. असा हा नवीन फंडा त्यांनी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर, व्यावसायिक, वकील, पत्रकारांच्या फेसबुकवर वापरून संबंधितांच्या मित्रांकडून रक्कम उकळली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचेच फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यानंतर आता माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन हल्ला चढवला आहे. या घडामोडीमुळे सायबर गुन्हेगारांनी नागपूरला टार्गेट केल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नसल्याने सर्वच क्षेत्रातील मंडळीत सायबर गुन्हेगारांची दहशत तीव्र झाली आहे. आता कुणाचा नंबर लागेल, असाही भीतीवजा प्रश्न त्याचमुळे सर्वत्र चर्चेला आला आहे.

---

कधी लागणार अंकूश

बिनबोभाट कुणाच्याही बँक खात्यात हात टाकणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर कधी अंकुश लावला जाणार, असा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतल्याचे म्हटले आहे. निर्ढावलेल्या सायबर गुन्हेगारांचा प्रभावीपणे बंदोबस्त केला जाणार असून त्यासंबंधीच्या उपाययोजनांवर सायबर एक्स्पर्टच्या मदतीने काम सुरू असल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले.

---

---

Web Title: Nagpur is the target of cyber criminals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.