Nagpur 'Something New ...! Screen to open on 17th | नागपुरात 'कुछ तो नया है...!' १७ ला उघडणार पडदा

नागपुरात 'कुछ तो नया है...!' १७ ला उघडणार पडदा

ठळक मुद्दे नागपूरकरांसाठी महापौरांचा अफलातून उपक्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौरसंदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूरकरांमध्ये ताणलेली आहे. काय आहे हे नवे हे जाणून घेण्यासाठी सोमवार १७ फेब्रुवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे कारण याच दिवशी ‘कुछ तो नया है...’ वरून पडदा उघडणार आहे.
संदीप जोशी यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सतत काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नागरिकांचा सहभागाशिवाय शहराचा विकास शक्य नाही, हे जाणत ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’, ‘ब्रेकफास्ट विथ मेयर’, शहरस्तरावरचे तक्रार निवारण शिबिर, झोनस्तरावर ‘जनता दरबार’ आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी ‘मम्मी पापा यू टू’ आदी अभियान त्यांनी राबविले. आता ही नवी संकल्पना अफलातून असेल, असे सांगण्यात येत आहे. अंबाझरीजवळ विवेकानंद स्मारक येथे काही तरी नवे साकारले जात आहे. यासाठी शहरातील काही तरुणाई एकत्र आली आहे. तरुणाईच्या सहकार्याने ही संकल्पना साकारली जात असून या माध्यमातून एक नवी चळवळ सुरू होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे. विवेकानंद स्मारकावर १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता महापौर याची घोषणा करण्यात आसल्याची माहिती त्यांनी दिली.
यादरम्यान विवेकानंद स्मारकाला शहरातील नागरिकांनी भेट द्यावी, जे काही तेथे नवे दिसेल त्यासंदर्भात आपल्याला काय वाटते, त्यामागे काय असू शकते, हे सुद्धा आपण सांगू शकता. आपण विवेकानंद स्मारकाला भेट दिली असेल आणि नवे काही तरी बघितले असेलच. बघितलेले नवे काय आहे, काय असू शकते, महापौरांची संकल्पना काय असू शकते, याबाबत ‘हॅलो महापौर’ या अ‍ॅपवर अभिप्राय कळविण्याचे आवाहन त्यांनी केले. हा मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा आणि त्यावर या नव्या संकल्पनेबाबत आपले अंदाज व्यक्त करा आणि प्रत्यक्ष नवे काय आहे, हे जाणण्यासाठी ठरलेल्या वेळी नागरिकांनी स्मारकस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Nagpur 'Something New ...! Screen to open on 17th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.